swt143.jpg
77412
खारेपाटण ः विद्यालयात ''स्वरपौर्णिमा'' कार्यक्रमात गीते सादर करताना विद्यार्थी.
खारेपाटण शाळेत ‘स्वरपौर्णिमा’ उत्साहात
गुरुपौर्णिमा सोहळाः विद्यार्थ्यांच्या गीत-नृत्याने रसिक मंत्रमुग्ध
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १४ : खारेपाटण येथील शेठ. न. म. विद्यालयात ‘स्वरपौर्णिमा’ हा कार्यक्रम नुकताच पार पडला. गुरुपौर्णिमेनिमित्त या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पहिली ते दहावी पाठ्यक्रमातील कवितांवर आधारित गायन, वादन, नृत्य, कविता अभिवाचन व एकपात्री अभिनयाच्या पंचसूत्री कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्ध झाले.
या कार्यक्रमात ७५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रशालेचे संगीत शिक्षक संगीत अलंकार संदीप पेंडूरकर यांची नावीन्यपूर्ण संकल्पना व संगीत संयोजनामुळे हा कार्यक्रम रंगतदार ठरला. प्राजक्ता ठाकूर देसाई हिने गुरुपौर्णिमेचे महत्त्व विशद केले. गुरुमहिमा व्यक्त करणारे नृत्य सातवीच्या विद्यार्थिनी आयुषी गुरव, दिबा ठाकूर, दिक्षा कर्ले व आराध्य पराडकर यांनी सादर केले. तेजल ठाकूर देसाई हिने ‘धरीला पंढरीचा चोर’ गीतातील भाव सादरीकरण केले. ‘देवा मला शाळेत जायचं हाय’ हे नृत्य तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. आठवीची भावस्पर्शी हिंदी कविता ‘छुप छुप अश्रू बहानेवालो’ प्राजक्ता ठाकूर देसाई हिने सादर केली.
बालकवींची श्रावणमासाचे महत्त्व विशद करणारी ‘श्रावण मासी हर्ष मानसी’ ही प्रसिद्ध कविता आयुषी गुरव हिने पाठांतर व अभिनययुक्त सादर करून रसिकांची मने जिंकली. ‘माय मराठी’ या कवितेवर नृत्य सादर करून पाचवीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मातृभाषेवरचं प्रेम आणि अभिमान व्यक्त केला. सहावीच्या मुलांनी ‘हंबरून वासराले’ गीताच्या सादरीकरणातून गोमाता आणि मातेच्या प्रत्येक रुपाची ओळख करून दिली.
पेंडूरकर यांनी स्वतः संगीतबद्ध केलेली आठवी हिंदी पुस्तकातील ‘चारू चंद्र की चंचल किरणे’ ही कविता सादर केली. सातवीतील गुरुप्रसाद सुतार याच्या पखवाज वादनाने सभागृह दुमदुमले. पहिली-दुसरीच्या विद्यार्थ्यांनी ‘चिऊताई चिऊताई’ या बालकवितेवर मनमोहक नृत्य सादर केले. कोकणाच्या निसर्गसौंदर्याची दहावीची कविता अनुक्षा पतयाण हिने सादर केली. ‘तू झालास मूक समाजाचा नायक’ या दहावी मराठीच्या कवितेवर प्राजक्ता ठाकूर देसाई हिने केलेल्या एकपात्री अभिनयाने रसिकांना अंतर्मुख केले. ‘आकाशी झेप घे रे पाखरा’ या कवितेतून लहानशा पंखांची मोठी ताकद सानिया पवार हिने रसिकांपर्यंत पोहोचविली.
‘जय जय भारत देशा’ कवितेवर राधा ठाकूर देसाई हिने देशभक्तीने भारलेले नृत्य सादर केले. शिक्षक लक्ष्मीकांत हरयाण यांनी सुमधुर गीत गायन केले. कार्यक्रमाची सांगता संगीत शिक्षक पेंडूरकर यांनी सहावीतीलकविता ‘बलसागर भारत होवो’ ही भैरवी रागामध्ये गायन करून केली. या कार्यक्रमास संगीत साथ श्रीधर पाचंगे, मंथन चव्हाण, आयुष मांगले, लक्ष्मीकांत हरयाण यांनी केली. पूनम गुरव, शार्मीन काझी व प्राथमिक विभागातील शिक्षिकांचे नृत्य दिग्दर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती जामसांडेकर, संस्कृती निगरे, प्राजक्ता ठाकूर देसाई व संस्कृती भोर यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.