कोट्यवधी थकीत बिलांमुळे ठेकेदारांवर आत्महत्येची वेळ
सुरेश चिपळूणकर ः अधिवेशनात निर्णय न झाल्याने नाराजी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २५ ः सांगली जिल्ह्यातील एका ठेकेदाराने जलजीवन मिशन योजनेंतर्गत केलेल्या कामाचे सुमारे दीड कोटी रुपयांचे बिल न मिळाल्याने आत्महत्या केली. या घटनेने रत्नागिरी जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनेंतर्गत व सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या ठेकेदारांच्या थकीत कोट्यवधी थकीत बिलांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आमच्यावरदेखील आत्महत्या करण्याची वेळ आणू नका, अशी संतप्त प्रतिक्रिया चिपळूण तालुका ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष सुरेश चिपळूणकर यांनी दिली.
घरगुती नळजोडणीद्वारे प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी हा उद्देश घेऊन केंद्र शासनाच्या जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात सुमारे १२०० कोटींच्या खर्चाचा कार्यक्रम आखण्यात आला. त्यानुसार अनेक कामेही मार्गी लागली. जिल्ह्याला दीड वर्षात केवळ १५ ते २० टक्केच निधी उपलब्ध झाला. यामुळे ठेकेदार हवालदिल झाले आहेत. दुसरीकडे देयकांअभावी कामेही अर्धवट राहिल्याने गावागावांत पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे. जलजीवन मिशन योजनेला शासनाकडूनच हरताळ फासला जात आहे. थकीत देयकांसाठी शासन-प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही बिले मिळत नसल्याने ठेकेदार आर्थिक अडचणीत आले आहेत. थकीत देयके लवकरात लवकर अदा करावीत, अशी मागणी जलजीवन मिशन योजनेंतर्गत कामे केलेल्या ठेकेदारांनी मागणी केली असून, आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आणू नका, अशी प्रतिक्रिया ठेकेदार संघटनेने व्यक्त केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत कामे केलेल्या जिल्ह्यातील ठेकेदारांची सुमारे ७०० ते ८०० कोटी रुपयांची देयके थकीत आहेत. यामध्ये उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे २०० कोटी रुपयांची देयके थकीत आहेत. ठेकेदारांनी केलेल्या कामांची बिले सुमारे १५ ते २० टक्केच येत असल्याने उर्वरित फरक काढण्याचे ठेकेदारांसमोर आव्हान आहे. ही बिले मिळावी, यासाठी चिपळूण तालुका ठेकेदार संघटनेने गेल्या सहा महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक देत मार्चपर्यंत बिले अदा करावीत, अशी मागणी केली होती. विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात ठेकेदारांच्या थकीत देयकांसंदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील ठेकेदारांनी नाराजी व्यक्त केली असून, आम्हा ठेकेदारांवरदेखील आत्महत्या करण्याची वेळ आणू नका, असा सवाल सुरेश चिपळूणकर यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.