८०२३८
८०२४०
८०२४१
८०२४२
इंट्रो
कोकण पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ मराठवाड्याला रेल्वेने जोडण्यासाठी चिपळूण-कराड रेल्वेमार्ग होणे आवश्यक आहे. पाटण तालुक्यातील वझेगाव येथे जून महिन्यात रस्त्याचे काम सुरू असताना हा रस्ता वाहून गेला. त्यामुळे गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग १७ दिवस बंद होता. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाले. अशा परिस्थितीत पर्यायी व्यवस्थेचा सर्वाधिक विचार केला गेला. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील जीवनावश्यक वस्तू कोकणात आणि कोकणातील बंदरांमार्गे देश-विदेशात पाठवण्यासाठीही चिपळूण-कराड रेल्वेमार्गाची निकड जाणवत आहे. हा रेल्वेमार्ग व्हावा यादृष्टीने खासदार नारायण राणे यांनी पुन्हा एकदा प्रयत्न सुरू केले आहेत. नुकतेच त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. सुदैवाने, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात सत्ताधारी लोकप्रतिनिधींची संख्या जास्त आहे. त्यामुळे चिपळूण-कराड रेल्वेमार्गाचे स्वप्न सत्यात उतरण्याची हीच वेळ आहे...!
- मुझफ्फर खान, चिपळूण
...............
चिपळूण-कराड रेल्वेमार्ग काळाची गरज
मालवाहतुकीसाठी महत्वाचा; विकासवाहिनी ठरेल
कोकण व पश्चिम महाराष्ट्र जोडणारा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी ते कोल्हापूर असा नवा रेल्वेमार्ग दृष्टिक्षेपात आला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी वैभववाडी-कोल्हापूर या नव्या प्रस्तावाचा विचार करतानाच चिपळूण ते कराड या कोकण ते पश्चिम महाराष्ट्र जोडणाऱ्या रेल्वेमार्गाचाही विचार करावा, अशीही मागणी खासदार नारायण राणे यांनी केली आहे. चिपळूण-कराड रेल्वेमार्ग प्रवासी आणि मालवाहतुकीच्यादृष्टीने उपयुक्त आहे. हा मार्ग झाल्यास पश्चिम महाराष्ट्राची बाजारपेठ आणि कोकणातील बंदरे एकमेकांना जोडली जातील. येथील आर्थिक विकासाला गती मिळेल. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र भागातील लोकांच्या जगण्याला बळ मिळेल.
-------
दृष्टिक्षेपात....
चिपळूण-कराड रेल्वेमार्ग झाल्यास
* कोकणातील उद्योगाला चालना मिळेल
* रोजगार वाढेल
* जलद दळणवळणाची सुविधा उपलब्ध
* पश्चिम महाराष्ट्र थेट कोकणाशी जोडला जाईल
* मत्स्योद्योगाला अधिक चालना मिळेल
* जलमार्गे आयात-निर्यात धोरणालाही बळ
* कोकणातील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
* पश्चिम महाराष्ट्रातील उत्पादना निर्यतीची सोय
-------
प्रवास कमी खर्चात कमी वेळात
जीवनावश्यक वस्तूंसाठी कोकण अजूनही पश्चिम महाराष्ट्रावर अवलंबून आहे. कोकणात लागणारा दूध, भाजीपाला, कडधान्य, ज्वारी, तांदूळ, चिकन, मटण, फुले इत्यादी लहान-मोठ्या वस्तूंचा पुरवठा दररोज होतो. कोकणातील बाजारपेठेत लागणारा माल आणि येथील नागरिकांच्या वापरातील वस्तूसुद्धा घाटावरून कोकणात येतात. त्यासाठी सध्या घाटमार्ग हाच पर्याय आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमध्ये उत्पादन होणाऱ्या मालाची पश्चिम महाराष्ट्रात रस्तेमार्गानेच वाहतूक होते. मंडणगडमधील बॉक्साईट असो किंवा खेर्डी, गाणे खडपोली औद्योगिक वसाहतीमधील कारखानदारांना लागणाऱ्या कच्च्या मालाची वाहतूक कुंभार्ली घाटरस्त्यामार्गे होते. कोकणातील शोरूममध्ये विक्रीसाठी येणारी सायकल, दुचाकी, चारचाकी घाटावरूनच आणली जातात. कोकणातील लोकं औषधोपचारासाठी मुंबईपेक्षा पश्चिम महाराष्ट्राला जास्त प्राधान्य देतात. पश्चिम महाराष्ट्रातील शिक्षणसंस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या कोकणातील मुलांची संख्या जास्त आहे. घाटावरचे अनेक तरुण-तरुणी नोकरीधंद्याच्या निमित्ताने कोकणात आहेत. काहीजणं चिपळूण ते रत्नागिरी रोजचा प्रवास करतात. तसेच अनेकजणं चिपळूण ते कोयना, चिपळूण ते कराड दररोज ये-जा करतात. ताम्हिणी, भोर, आंबा आणि कुंभार्ली घाटमार्गे दररोज अडीचशे ते तीनशे गाड्यांच्या फेऱ्या ये-जा करतात. एकट्या चिपळूण आगारातून दररोज ३४ फेऱ्या पश्चिम महाराष्ट्रात सोडल्या जातात. त्यातून कमीत कमी १२०० ते १५०० प्रवाशांची वाहतूक चिपळूणमधून पश्चिम महाराष्ट्रात होते. तेवढीच माणसे दिवसाला घाटावरून चिपळूणमध्ये येतात. पुणे मार्गावर १३ टेम्पो ट्रॅव्हल्स चालतात. चिपळूणमधून कोल्हापूरला एसटीने जायचे असल्यास ६ तास लागतात. रेल्वेमार्ग झाल्यास हा प्रवास दीड ते दोन तासावर येईल आणि कमी पैशात होईल. यातून सामान्य नागरिकांना दिलासा मिळेल.
............
लोकप्रतिनिधींच्या गावीही नाही
पश्चिम महाराष्ट्रातील जीवनावश्यक वस्तू ट्रक आणि कंटेनरच्या माध्यमातून कोकणात पाठवल्या जातात. साखरेसह अनेक जीवनावश्यक वस्तू कोकणातील बंदरामार्गे देश-विदेशात पाठवल्या जातात. त्यासाठी सध्या कुंभार्ली, आंबा, भोर आणि ताम्हिणी घाटरस्त्याचा उपयोग होतो. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील निर्यातपूरक शेती उत्पादन, औद्योगिक उत्पादनांचे कंटेनर भरून ३७० किलोमीटरचा प्रवास करून मुंबईतील पंडित जवाहरलाल नेहरू पोर्ट व अपोलो बंदराकडे पाठवले जाते. अशाच प्रकारे कर्नाटक सीमाभागातील माल ६०० किलोमीटरचा प्रवास करून मंगळूर (दक्षिण कर्नाटक), कोची (केरळ) बंदरावरून परदेशी पाठवला जातो. त्यात रस्त्यावरील वाहतुकीचे अडथळे पार करताना इंधन खर्च वाढतो, माल वेळेत पोहोचेल की, नाही ही चिंता वाढते. त्याचवेळी कमी वेळेत, कमी खर्चात निर्यातीचा माल पाठवण्यासाठी जयगड बंदर उत्तम पर्याय ठरू शकते; तिथपर्यंत कमी खर्चात पश्चिम महाराष्ट्रातील मालाची वाहतूक करण्यासाठी चिपळूण-कराड हा रेल्वेमार्ग होणे अत्यंत गरजेचे आहे; मात्र त्यावर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी फारशी चर्चा करताना दिसत नाहीत.
------
शेतीमाल परदेशी पाठवण्यासाठी पूरक सुविधा
रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड महत्त्वाचे बंदर आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील औद्योगिक उत्पादने मत्स्य, आंबा, साखर, कापड अशा अनेक वस्तूंच्या निर्यातीसाठी गेली ३० वर्षे या बंदराचा उपयोग झाला. या बंदरात रशिया, ऑस्ट्रेलिया, जर्मनीकडून जहाजातून मालाची वाहतूक होते. जवळपास ७० ते ८० हजार टनाची जहाजे या बंदरात येतात. तेवढा माल निर्यात व आयात होऊ शकतो. त्यासाठी धक्का बांधला आहे, गोदामे आहेत. या बंदरापासून जवळच आंग्रे बंदरही आहे, येथेही जहाजे येतात. या दोन्ही बंदरांत पायाभूत व तांत्रिक सुविधा सक्षमीकरणातून दोन्हींचा उपयोग पश्चिम महाराष्ट्रातील उत्पादने निर्यातीसाठी होऊ शकतो. शेतीमालासाठी पूरक सुविधा कोल्हापुरातील शेतीमालाची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. १८०० कोटींचे वार्षिक खरेदी-विक्री व्यवहार होतात. स्थानिक गरज भागवली जाते; मात्र यातील कोल्हापुरी गुळाला जीआय मानांकन मिळाले. कोकणी हापूस आंब्याला जीआय मानांकन आहे. सांगोल्याची डाळिंबे, तासगावाची द्राक्ष मानांकनांची आहेत. त्याची निर्यात होते. या उत्पादनांना परदेशी बाजारपेठ मिळणे आवश्यक आहे. अनेकदा स्थानिक बाजारपेठेत अचानकपणे शेतीमालाची आवक वाढते. भाव पडतात आणि शेतकऱ्यांपासून ते मालवाहतूकदारांपर्यंत बहुतेक घटकांचे नुकसान होते. यातून अनेकदा शेतकऱ्याला सुयोग्य नफा न मिळाल्याने शेती धोक्यात येते, ही अनेक वर्षांची स्थिती आहे. हे चित्र बदलण्यासाठी बंदराशेजारील गावात शेतीमाल खरेदी-विक्री व्यवस्था, पॅकेजिंग व्यवस्था व प्रीझर्व्हेशन म्हणजेच कोल्डस्टोरेज अशा पूरक व्यवस्था सक्षम कराव्या लागतील; मात्र त्या करण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. शेतीमाल परदेशी पाठवण्यासाठी पूरक सुविधा झाल्यास नुकसान थांबून नफा वाढेल.
...........
मार्च २०१२ मध्ये या प्रकल्पाला मंजुरी
विदर्भ आणि मराठवाड्यातील औष्णिक वीजप्रकल्पांना लागणारा कोळसा परदेशातून समुद्रमार्गे आणल्यास औष्णिक प्रकल्पापर्यंत हा कोळसा पोहोचण्यासाठी रेल्वेमार्ग हा सोपा पर्याय आहे. कोकणातील बंदरांवर कोळसा उतरवायचा तेथून चिपळूण-कराड-मिरज जंक्शन रेल्वेमार्गाने पुढे विदर्भात पाठवायचा असा प्लान होता. यासाठी मार्च २०१२ मध्ये या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. या रेल्वेमार्गाच्या बांधकामासाठी शापूरजी पालनजी कंपनी आणि कोकण रेल्वेमध्ये करार करण्यात आला होता नंतर तो रद्द करण्यात आला. या रेल्वेमार्गामध्ये कोकण रेल्वे आणि खासगी भांडवलाचे प्रमाण अनुक्रमे २६ आणि ७४ टक्के होते.
..........
असा असू शकतो प्रकल्प
* २०१४ मध्ये प्रकल्पाचा अंदाजित खर्च ३१९५.६० कोटी
* रेल्वे मार्गाची लांबी १०३ किमी आहे.
* बोगद्यातून जाणाऱ्या मार्गाचे अंतर ४६ किमी
* कमीत कमी वृक्षतोड आणि डोंगरकटाई होणार आहे.
* मार्गात १६ मोठे बोगदे, ५८ पूल बांधण्याची गरज
* सर्वात मोठा बोगदा ८ किमीचा प्रस्तावित आहे.
* मार्गावर स्थानके ६ असणार आहेत.
...............
आराखडा तयार व्हावा
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतीमाल असो किंवा औद्योगिक माल असो, तो बंदरामधून जहाजांद्वारे परदेशात पाठवण्यासाठी मालवाहतुकीची सुविधा सक्षम करण्यासाठी नियमावली व पायाभूत सुविधांसाठी स्थानिक खासदारांमार्फत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा लागेल; मात्र असा पाठपुरावा करण्यापूर्वी पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात व कोकणातून बंदराद्वारे परदेशात कोणता माल जाऊ शकतो. कोणत्या मालाची वाहतूक करण्यात कोणत्या अडचणी आहेत व त्या दूर करण्यासाठी उपाययोजना काय आहेत० व अशा उपाययोजना केल्यानंतर कोणकोणत्या घटकाला त्याचा लाभ होऊ शकतो. चिपळूण-कराड रेल्वेमार्ग झाल्यास त्याचा फायदा कसा होईल, या अनुषंगाने कृती आराखडा तयार करण्याला प्राधान्य द्यावे लागेल. त्यासाठी अनेक घटकांनी एकत्र येत चर्चा करणे आवश्यक आहे.
-----
या घटकांच्या पुढाकाराची गरज
कोकणातील उद्योजकांच्या संघटना, आंबा, काजू बागायतदार, मत्स्य व्यावसायिक, खासगी औद्योगिक कंपन्या, औषधनिर्माण करणारे कारखानदार, पॅकेजिंग, कार्गो सेवा, वाहतूकदार, माथाडी कामगार आदी घटकांचा बंदर विकासाशी संबंध आहे. या साऱ्यांनी एकत्र येऊन बंदर विकासाची मागणी त्यासाठी पूरक सुविधांची गरज या विषयी आराखडा तयार करून केंद्र व राज्यशासनाकडे पाठपुरावा करावा लागेल.
-------
चौकट
...यामुळे मिळेल रो-रो सेवेला चालना
* पश्चिम महाराष्ट्रातून दररोज १ ते सव्वा लाख लिटर दूध जिल्ह्यात येते.
* दररोज चिकनसाठीच्या कोंबड्यांचे ३५ टेम्पो जिल्ह्यात येतात.
* १० टन भाजीपाला आठवड्याला पश्चिम महाराष्ट्रातून जिल्ह्यात येतो.
* मटन विक्रेते आठवड्याला १५०० ते २ हजार बोकड घेऊन येतात.
* कोकणातील आंबा, जांभा, मच्छी, बॉक्साइट, एमआयडीसी तयार होणारे उत्पादन आणि इतर मालाच्या वाहतुकीसाठी २०० ट्रक या मार्गावर धावतात. त्यामुळे रो-रो सेवेला चालना मिळेल.
................
80244
कोट १
राज्यातील बंदरे एकमेकांशी जोडायची असतील तर रेल्वे मार्ग आवश्यक आहे. ज्या गतीने रस्ते मार्ग होत आहेत, त्याच गतीने रेल्वे मार्गही झाले पाहिजेत. चिपळूण-कराड रेल्वे मार्गाचे स्वप्न मागील ४२ वर्षांपासून पाहिले जात आहे. ते पूर्ण झाले तर त्याचा फायदा केवळ कोकण आणि पाश्चिम महाराष्ट्राला नव्हे तर देशाला होईल.
- प्रशांत पटवर्धन, अध्यक्ष, उद्योजक संघटक जिल्हा
..........
80243
कोट २
पश्चिम महाराष्ट्रातील निर्यातीसाठीचा माल मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट व अपोलो पोर्टवर पाठवला जातो. हे अंतर जास्त दूरचे आहे. मात्र तिथे निर्यातीसाठी लागणाऱ्या सुविधा आहेत. तशा सुविधा कोकणातील बंदरावर कराव्या लागतील. मुंबईतील पर्यायी जहाजांची संख्या बऱ्यापैकी आहे. तशी पर्यायी जहाजांची सुविधा जयगड किंवा कोकणातील अन्य बंदरावर करावी लागेल. त्यानंतर निर्यातदार जयगडवरून माल निर्यातीस पाठवतील. तेव्हा मुंबई बंदरावरील येणारा ताण कमी होईल. कोकण बंदराजवळ असल्याने वाहतूक खर्चात बचत होईल. चिपळूण-कराड मार्ग झाल्यास वाहतूक खर्चात खूप बचत होईल. कच्चा माल ने-आण करणे सोयीचे ठरेल.
- प्रशांत यादव, उद्योजक. चिपळूण
-----
80246
कोट ३
रेल्वेत येणारे माल उतरून घेण्यासाठी माथाडी कामगारांची गरज असते. असे माथाडी कामगार ग्रामीण भागातून शहरात बहादूर शेख नाक्यावर येतात. मात्र सर्वांनाच काम मिळते असे नाही. त्याच धर्तीवर रेल्वेतून येणारा माल उतरून घेण्यासाठी माथाडी कामगारांची गरज भासते. चिपळूण-कराड रेल्वे मार्ग विकसित झाल्यास तेथे येणाऱ्या मालाची वाहतूक वाढल्यास चिपळूणसह गुहागर, खेड भागातील अनेक माथाडींना तिथे रोजगार मिळू शकतो. त्यांना रोजगार शोधण्यासाठी मुंबईत जाण्याची गरज नाही.
- सतीश मोरे, जिल्हाध्यक्ष, भाजप
-----
80245
कोट ४
प्रवासी आणि मालवाहतुकीच्या दृष्टीने चिपळूण रेल्वे मार्ग होणे अत्यंत आवश्यक आहे. निसर्गाची कमीत कमी हमी करून हा मार्ग उभारणे शक्य आहे. सुदैवाने रत्नागिरी आणि सातारा दोन्ही जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रतिनिधी सत्ताधारी पक्षाचे आहेत. राज्यात मंत्री आहेत. दोन्ही जिल्ह्यातील खासदार भाजपचे आहेत त्यामुळे केंद्र आणि राज्याकडून हा मार्ग मंजूर करून घेणे सोपे आहे.
- राकेश जाधव, अलोरे ता. चिपळूण
.................
स्वतंत्र चौकट
80242
चिपळूण-कराड रेल्वे मार्गाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करीत आहे. रेल्वे मंत्र्यांशी भेट घेऊन चर्चा केली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. नव्याने प्रस्ताव तयार करण्याची सूचना केली आहे. मी कोकण रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांची लवकरच बैठक घेऊन या मार्गासाठी पाठपुरावा सुरू करणार आहे.
- नारायण राणे, खासदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.