श्रावण विशेष------लोगो
80254
कसबा येथील शंभू महादेवाचे संगम मंदिर
शास्त्री-अलकनंदा नद्यांचा संगम ; महादेवांचे संपूर्ण कुटुंबच एकत्र
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २७ः संगमेश्वर तालुक्यातील ऐतिहासिक कसबा गावात अलकनंदा आणि शास्त्री या दोन पवित्र नद्यांच्या संगमावर उभे असलेले शंभू महादेवांचे संगम मंदिर त्याच्या अलौकिक स्थानमहात्म्यासाठी प्रसिध्द आहे. असे असले तरीही येथील स्थानमहात्म्य फारसे कोणाला माहित नाही.
शास्त्री नदीचा उगम थेट विशाल सह्याद्री पर्वतरांगातून, तर अलकनंदा या नदीचा उगम सप्तेश्वर या पवित्र देवस्थानाजवळून होतो. शास्त्री आणि अलकनंदा नद्या जेथे एकत्र होतात, तेथेच हे मंदिर उभारण्याचा चालुक्य राजांचा विशेष हेतू असावा. त्यामुळे या शिवमंदिराला ''संगम'' असे पडल्याची आख्यायिका आहे. पहिल्या श्रावण सोमवारी कसबा गावातील या मंदिरात शिव भक्तांची मोठी गर्दी होते.
संगम मंदिराचा परिसर निसर्गरम्य असून येथे आल्यानंतर परिसरातील शांतता आणि पावित्र्य पाहून मन प्रसन्न होते. या संगम मंदिरामध्ये महादेवांचे संपूर्ण कुटुंबच एकत्र आहे, याबाबतची माहिती फार कमी लोकांना असल्याने मंदिराची वरवर पहाणी करून भक्तगण येथून बाहेर पडतात. या मंदिराची रचना अत्यंत विचारपूर्वक आणि कल्पकतेने करण्यात आली आहे. काळ्या पाषाणात उभारलेले हे मंदिर विस्ताराने फार मोठे नाही. साधारणतः तीन फूट उंचीच्या चौथऱ्यावर उभारण्यात आलेल्या या मंदिराला सभामंडप आणि गर्भगृह असे दोनच भाग आहेत. सभामंडप आकाराने छोटा असून त्याच्या दोन्ही बाजूला कमानीची रचना आणि मोकळा भाग आहे. सभामंडपात नंदी असून डाव्या बाजूला गणपतीची मूर्ती आहे. मंदिराचे गर्भगृह काळोख्या भागात असून शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी पायऱ्या उतरून खाली जावे लागते. शिवलिंगाच्या मागील बाजूस विशिष्ट उंचीवर एक छोटा झरोका असून येथून थोडाफार प्रकाश शिवलिंगावर पडत असतो. मंदिराच्या परिसरात आल्यानंतर प्रथम पवित्र संगमात हातपाय धुवूनच दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करावा असे सांगितले जाते. शिवलिंगाच्या मागील बाजूस पार्वतीची आणि डाव्या बाजूस दर्शनयोगाव्यतिरिक्त अन्य वेळी महिलांना दर्शन घेण्यास प्रतिबंध असलेल्या कार्तिकस्वामींची मूर्ती आहे. महादेवांचे संपूर्ण कुटुंबच या मंदिरात एकत्र आहे. हा योग फार कमी ठिकाणी पहायला मिळतो. मंदिर परिसराजवळ जिल्हा नियोजनच्या निधीतून मोठा घाट बांधून मंदिरालगतच्या घाटाचा विस्तार करण्यात आला आहे. ज्यावेळी कार्तिक स्वामींचा महिलांना दर्शन योग असतो त्यावेळी या संगम मंदिरात मोठी गर्दी होते. आता श्रावण सोमवारीही शिवभक्त येथे दर्शनासाठी येतात.
चौकट
गया–प्रयाग एवढेच महत्व
मंदिराला लागूनच एक घाट बांधण्यात आलेला आहे. त्या घाटावरून संगमाच्या पात्रात उतरता येते. संगम मंदिराच्या या घाटाला गया–प्रयाग एवढेच महत्व असल्याचे स्थानिकांचे मत आहे. काशी, गया, प्रयाग येथे जे धार्मिक विधी केले जातात, तेच संगम मंदिराजवळ असलेल्या अलकनंदा आणि शास्त्री नदीच्या संगमावर केले जाऊ शकतात असे अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी सांगितले आहे.