श्रावण विशेष - लोगो
80237
80248
स्वयंभू उत्तरेश्वरांचा आर्शीवाद लाभलेले ‘दहागाव’
शिवलिंग उत्तर दिशेला; श्रावणात विशेष कार्यक्रम
सचिन माळीः सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २८ः भारतातील वेगवेगळ्या प्रांतात शिव तत्वाची आराधना वेगवेगळ्या रुपात केली जाते. मंडणगड तालुक्याचे प्रवेशद्वार अशी ओळख असलेल्या दहागाव या गावाला भगवान शंकराचा आशिर्वाद लाभलेला आहे. भगवान शिवशंकर स्वयंभू श्री उतरेश्वर या नावाने दहागावमध्ये विराजमान झाल्याची आख्यायिका आहे. उत्तर दिशेला असणाऱ्या शिवलिंगामुळेही उत्तरेश्वर या नावाने हे मंदिर ओळखले जाते. श्रावणातील सोमवारी या मंदिरात पूजाअर्चा, अभिषेक, भजन केले जाते.
उतरेश्वरा देवळासंबंधी गावात प्रसिध्द असलेल्या अख्यायीकेनुसार अगदी प्राचीन काळी या गावात एक गरीब ब्राम्हण निवास करीत होता. त्यांच्याकडे एक गाय होती. त्याकाळी गाय हे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन असे. गाय दूध देत नसल्यामुळे ब्राम्हणाने त्या गायीवर पाळत ठेवली. गाय दूध का देत नाही याचा शोध घेताना गावात सध्या उतरेश्वर स्थानापन्न असलेल्या ठिकाणी गाईचे दूध सांडताना दिसून आले. या ब्राम्हणाने गाईचे दूध सांडत आहे, तिथे साफसाफाई करुन पाहीले. तेव्हा उत्तर दिशेला असलेले शिवलिंग दिसून आले. त्यामुळे ही स्वयंभू शिवलींग उतरेश्वर नावाने प्रसिध्द झाले. नवसाला पावणारे जागृत देवस्थान म्हणून ग्रामस्थांचा विश्वास आहे. ग्रामस्थांनी वर्गणी काढून या मंदिराची स्थापना केली.
उतरेश्वरांचा त्रिपूरी व महाशिवरात्री उत्सव प्रसिध्द असून यानिमीत्ताने गावात तीन दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गावातील सर्व जाती-धर्माचे लोक या कार्यक्रमात सहभागी होतात. भजन, पूजन, धार्मिक कार्यक्रम, विविध गुणदर्शन कार्यक्रमांसह उतरेश्वरांची सेवा करण्यासाठी नाटक सादर करण्याची पंरपरा गेली ५० वर्षांपासून सुरु आहे. गावाच्या सांस्कृतिक लोकजीवनाशी उत्तरेश्वर मंदिराचा मोठा प्रभावही दिसतो. उत्तरेश्वरांच्या पूजेची जबाबदारी गावातील जंगम कुटुंबाकडे आहे. त्यातही कोकणी पथापंराप्रमाणे मान, नवस आदी पंरपरा श्रध्दापुर्वक पाळल्या जातात.
चौकट
तीन उत्सव महत्वाचे
देवळात साजऱ्या होणाऱ्या उत्सवात त्रिपुरी शिमगा, महाशिवरात्री व दसरा या उत्सवाचे महत्व अधिक आहे. त्रिपुरारी पौर्णिमेला मंदिर सजवले जाते. तेव्हा तीन दिवस विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. त्रिपुरावेळी भोपळ्यामध्ये दिवा पेटवून दीपमाळेच्या कळासावर स्थापित केला जातो. हा सोहळा डोळ्यात साठवू घेण्यासाठी तालुक्यातील शिवभक्तसांसह विविध ठिकाणीची भावीक मंडळी मोठी गर्दी करतात. रात्रभर भोपळ्यात दिवा पेटता ठेवला जातो.