वसा वसुंधरा रक्षणाचा.........लोगो
(१८ ऑगस्ट टुडे ३)
पर्यावरणपूरक उत्सवामधील अतिशय महत्त्वाची संकल्पना म्हणजेच पुनरावर्तन. पुनरावर्तन म्हणजे जेथून आले, त्याठिकाणी परत देऊन निसर्गचक्र पूर्ण करणे. आपल्याकडील विसर्जित मूर्ती अथवा वस्तू पुनर्वापर प्रकल्पाकडे शास्त्रोक्त पद्धतीने विघटनासाठी पाठविणे, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत....!
- rat५p७.jpg-
P25N86679
- डॉ. प्रशांत परांजपे, दापोली.
-------
पुनरावर्तन !
गेल्या दोन भागांमध्ये पर्यावरणपूरक उत्सवांविषयी माहिती जाणून घेतली. ती आचरणात आणण्याचा संकल्प या गणेशोत्सवानिमित्त सर्वांनी केला असेलच. उत्सवांमधील फार मोठा उत्सव आहे गणेशोत्सव. तो अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. या उत्सवानंतर श्री गणेशाचे विसर्जनही मोठ्या थाटामाटात होईल. हे विसर्जन करताना यंदा पुनरावर्तन या संकल्पनेनुसार विसर्जनात थोडासा बदल केला तर सुजलाम सुफलाम आणि स्वच्छ राखण्यास हातभार लावल्याचे समाधान मिळेल.
*पुनरावर्तन म्हणजे काय...
एखाद्या वस्तूचा वापर केल्यानंतर ती पुनर्वापराकरिता पुनर्वापर प्रकल्पाकडे पाठवण्याची शास्त्रोक्त व्यवस्था करणे. याच संकल्पनेतून पर्यावरण पूरक श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करणार आहोत. नवीन शासन निर्णयानुसार नदी, नाले, समुद्र या ठिकाणी श्री गणेश मूर्तींचे विसर्जन न करता ते कृत्रिम तलावामध्ये करणार आहोत, किंबहुना अशा प्रकारचे आवाहन शासनाने पर्यावरणाच्या, जलप्रदूषणाच्या बचावासाठी केले आहे. कारण आजही लाखो गणेशमूर्तींपैकी ५० टक्के पेक्षा अधिक मूर्ती या पर्यावरण पूरक नसल्याचे एका सर्वेक्षणातून कटू सत्य समोर आले आहे.
पर्यावरण पूरक मूर्ती म्हणजेच शाडूच्या मूर्ती, लाल मातीच्या मूर्ती, पेपर मॅशपासून बनवलेल्या मूर्ती किंवा गोमय आणि लाल माती यांच्या मिश्रणातून तयार केलेल्या मूर्ती. ज्या शंभर टक्के पाण्यामध्ये विरघळतात आणि ती माती किंवा ते जे मिश्रण आहे, त्याचा वापर हा पुढील वर्षीच्या गणेशमूर्ती तयार करण्याकरिता करता येतो. यामुळे कोणतीही हानी निसर्गाला किंवा जलस्रोतांना पोहोचत नाही.
मात्र, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या असलेल्या मूर्ती यांचे पाण्यामध्ये विघटन होत नसल्यामुळे अतिशय गंभीर असं चित्र हे विसर्जनानंतर जलस्रोतांच्या किनाऱ्यावर आपल्याला प्रत्येकालाच प्रतिवर्षी दिसून येतं. अशा मूर्ती दिसल्यानंतर त्या पुन्हा उचलतो आणि खोल पाण्यामध्ये पुन्हा विसर्जित करतो. त्या नजरे आड गेल्या म्हणजे त्यांचे विसर्जन झाले, असं होत नाही. कालांतराने पुन्हा त्या किनाऱ्यावरच आलेल्या निदर्शनास येतात. किंबहुना मूर्तीच्या सजावटीकरिता हिरे, मणी जे कृत्रिम आहेत, ते खोटे हार किंवा वस्तू या मूर्ती समवेतच विसर्जित केल्या जातात. ज्या पाण्यामध्ये शंभर टक्के विरघळत नाहीत आणि त्यामुळे त्या पुन्हा किनाऱ्यावर फेकल्या जातात. हे टाळण्यासाठी आपल्याला पुनरावर्तन या संकल्पनेचा अंगीकार करणे आवश्यक आहे. स्थानिक प्रशासनाने केलेल्या कृत्रिम तलावाचाच विसर्जनासाठी आपण वापर केला तर पुढचे येणारे अनेक प्रश्न कमी होऊ शकतात.
ज्या मूर्ती पाण्यामध्ये विरघळणार नाहीत, त्या मूर्तींच्या विघटनाची स्वतंत्र व्यवस्था ही प्रशासनाला करता येईल आणि ज्या मूर्ती पाण्यामध्ये विरघळणार आहेत, त्या विरघळल्यानंतर ती माती मूर्तिकारांना पुन्हा देऊन पुढील वर्षी त्याची मूर्ती बनवण्यासाठी त्याचा उपयोग करता येणार आहे. त्यामुळे आपल्याकडून विसर्जित केलेल्या श्रींच्या मूर्तीला आपण पुढच्या वर्षी पुनर्प्रस्थापित करण्यासाठी १०० टक्के प्रयत्नशील राहणार आहोत किंवा ते समाधान आपल्याला मिळणार आहे. बाप्पा हा विसर्जित होणार नसून, तहहयात वेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याच मनामध्ये आणि आपल्या परिसरामध्ये राहणार आहे.
या बाबतीत अतिशय अभिनंदनास्पद आणि अनुकरणीय असा उपक्रम पुण्यातील कोथरूड येथे सुरू आहे. या ठिकाणी पर्यावरण पूरक मूर्ती एक रुपयामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशा पद्धतीच्या उपक्रमांची माहिती होणं आणि त्याचा प्रचार-प्रसार होणंही अत्यावश्यक आहे. कारण ही १०० टक्के पर्यावरण पूरक मूर्ती ही आपल्या घरीच विसर्जित करायची संकल्पना आहे. आपल्या घरी टब किंवा पिंपामध्ये या मूर्तीचे विसर्जन करावे आणि ती मूर्ती विसर्जित झाल्यानंतर जी शाडूची माती शिल्लक असेल ती मूर्तिकारांना आपण पुन्हा द्यायची आहे. लाल माती आणि गोमयपासून बनवलेल्या मूर्तीचे विसर्जन झाल्यानंतर ती माती आपण आपल्या परिसरातील कोणत्याही झाडाला समर्पित करू शकतो. त्यामुळे श्रींच्या आराधना केलेली जी मूर्ती आहे, ती आपल्याच परिसरामध्ये वास्तव्यास कायमस्वरूपी वेगळ्या स्वरूपात राहून पुनरावर्तीत होणार आहे.
किती सुंदर कल्पना आहे – श्रींची मनोभावे आराधना करायची, मनोभावे त्याचं विसर्जन करायचं आणि पुन्हा आमच्याकडे येण्यासाठी त्याचं पुनरावर्तन स्वरूप निर्माण करायचं. हे का करायचं? हे प्रतीक कसले आहे? तर, आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक वस्तूचा सन्मान आपण करायचा आहे. तयार होणाऱ्या प्रत्येक वस्तूचं पुनरावर्तन करणे अत्यावश्यक आहे. आणि हेच सूत्र आपण सर्व बाबतीत वापरलं तर कचऱ्याचा ‘आ’ वाचून उभा असलेला प्रश्न चुटकीसरशी सुटण्यास मदत होणार आहे.
बुद्धी देवतेने आपल्याला हे सूचित केलं आहे की, आता पुनरावर्तनाशिवाय पर्याय नाही. जर या पद्धतीने आराधना केली नाही तर आपली सेवा मान्य होईल का, याचा विचार प्रत्येकाने करावा.
श्रद्धा असणं फार महत्त्वाचं आहे आणि आपली श्रद्धा ही पुनरावर्तनावर आता असणे आवश्यक आहे. येणारा काळ हा गंभीर आहे आणि त्या होणाऱ्या गंभीर परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठीच पुनरावर्तन अंगीकारण अत्यावश्यक आहे. शाळेमध्ये जे शिकत आलो आहोत – कचरा हे दुसऱ्या वस्तूचे ‘रॉ मटेरियल’ आहे. अर्थात, खराब झालेली वस्तू ही दुसऱ्या एखाद्या वस्तूचा कच्चा माल आहे. हे प्रत्येकाने समजून घेणं अत्यावश्यक आहे. पुनरावर्तन हे याच गोष्टीचे प्रतीक आहे. आज जगभरामध्ये कचरा आणि प्लास्टिक कचरा हा प्रश्न प्रचंड भेडसावत आहे. त्याच्यापासून सुटका मिळवून घ्यायची असेल तर प्रत्येकाने आपल्या घरामधील कचऱ्याचे नेमाने वर्गीकरण करून, तो कचरा पुनर्वापर प्रकल्पाकडे पाठवण्यासाठी ‘मी सज्ज होणार आहे’ असा संकल्प या गणेशोत्सवात प्रत्येकाने करणे आवश्यक आहे.
(लेखक शाश्वत पर्यावरण विषयात डॉक्टरेट पदवीधारक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.