कोकण

लोकसेवेचा वसा आय़ुष्यभर जपला

CD

टीपः swt3018.jpg मध्ये फोटो आहे.
88249
अनिल पाटील

लोकसेवेचा वसा आयुष्यभर जपला

अनिल पाटील ः नियमाच्या चौकटीत राहून जनतेला न्याय

विनोद दळवी : सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ३० ः प्रत्येकाचे प्रश्न वेगळे असतात. सगळ्यांना एकाच चौकटीत बसवणे शक्य नसते. चौकटीत बसत असल्यास उत्तमच; पण कधी कधी परिस्थितीनुसार थोडे-फार लवचिक होऊनच लोकांना न्याय देता येतो. लोकसेवेचा वसा खऱ्या अर्थाने जनतेला लाभदायी ठरावा, यासाठी मी आयुष्यभर प्रयत्न केला, तसाच प्रयत्न अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी करावा, असे विचार निवृत्त होताना सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी व्यक्त केले.
सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी म्हणून ६ सप्टेंबर २०२४ ला पदभार सांभाळलेले अनिल पाटील आज (ता. ३१) सेवानिवृत्त होत आहेत. त्या अनुषंगाने ‘सकाळ’शी संवाद साधत त्यांनी शालेय जीवनापासून जिल्हाधिकारीपदापर्यंत केलेल्या वाटचालीबाबत सांगितले. ते म्हणाले, ‘मी कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील केखले या गावचा आहे. माझे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. दहावीपर्यंतचे शिक्षण कोल्हापूर येथील जिल्हा परिषदेच्या राजश्री शाहू महाराज विद्यानिकेतन शाळेत झाले. अकरावी, बारावी शिक्षण वारणानगर येथे विज्ञान शाखेत घेतले. कोल्हापूर येथेच बी.एस्सी. अॅग्री शिक्षण पूर्ण केल्यानंतर राहुरी येथे एम.एस्सी. पूर्ण केले. शिक्षण घेत असतानाच माझी एमपीएससी परीक्षेची ओळख झाली. या परीक्षेत उत्तीर्ण होऊन ‘वित्त व सेवा वर्ग- २’ या पदावर नियुक्ती झाली. त्यानंतर कोल्हापूर येथील ट्रेझरीमध्ये नियुक्ती झाली. तेथे मी बिले पास करायचो. दिवसाला किमान एक हजार स्वाक्षऱ्या मी करीत होतो. त्यानंतर शासनाने ऑडिटर म्हणून नियुक्ती केली. जिल्हा परिषद, नगर परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायत यांच्या कामाचे मी ऑडिट केले. हे काम करीत असताना अभ्यास थांबविला नव्हता. याच दरम्यान पुन्हा एमपीएससीची परीक्षा दिली. त्यात उत्तीर्ण झाल्यावर उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली. नियुक्तीच्या सुरुवातीच्या काळात मला परिवेक्षाधिन कार्यकाळ रत्नागिरी जिल्ह्यात घालवायला मिळाला. या दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात तहसीलदार आणि राजापूर तालुक्यात प्रांताधिकारी म्हणून काम पाहिले. सिंधुदुर्ग जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून ११ महिने काम केले. त्यानंतर अलिबाग प्रांताधिकारी म्हणून बदली झाली. तेथे पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. मुलांच्या शैक्षणिक दाखल्यासाठी शिबिरे घेतली. लोकसहभागातून प्रांताधिकारी तसेच अन्य महसूल इमारती उभारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शासनाने मुंबई येथील नागरी पुरवठा विभागात नियुक्ती केली. येथे कोर्ट केसेसचा विभाग सांभाळला. त्यानंतर वडाळा येथील नागरी पुरवठा विभाग मुख्यालय आणि सिडको येथे अतिक्रमण निर्मूलन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. यावेळी अनधिकृत घरे, मंदिरे पाडली. हा काळ तणावाचा होता. अतिक्रमणे तोडत असल्याने नागरिकांची नाराजी होती. त्यामुळे हा काळ सेवेतील कठीण काळ ठरला.
नवी मुंबई येथे विमानतळ भूसंपादनासाठी अधिकारी म्हणून यशस्वी काम केल्यानंतर शासनाने अपर जिल्हाधिकारीपदी पदोन्नती दिली. नंदुरबार जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले. तेथे सरदार सरोवर प्रकल्पाचे अनेक प्रश्न प्रलंबित होते. त्यांना न्याय देण्याचे काम केले. महाराष्ट्र विमानतळ कंपनी येथे २०१८ मध्ये अपर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली. याचवेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळावर व्यवस्थापकीय संचालक म्हणून तीन वर्षे काम केले. तेथे काम करताना राज्यातील ८० हजार मराठा तरुणांना व्यवसायासाठी कर्ज दिले. पोल्ट्री, दुकान, शेती किंवा अन्य विविध व्यवसायांसाठी कर्ज पुरवून त्यांना उद्योजक म्हणून उभारी देण्याचे प्रयत्न केले.
यानंतर शासनाने सनदी अधिकारी म्हणून बढती दिली. जुलै २०२१ मध्ये गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती दिली. येथे अडीच वर्षे कार्यरत असताना त्या जिल्ह्यातील नागरिकांचे जीवन अधिक सुकर करण्यासाठी प्रयत्न केला. त्यानंतर हापकीन बायोफार्मा येथे नियुक्ती झाली. तेथे बंद पडलेली औषध निर्मिती पुन्हा सुरू केली. शासनाची औषधे मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला. येथे सहा महिने काम करताना हापकीन बायोफार्माला ऊर्जितावस्था आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हाधिकारीपदी नियुक्ती मिळाली.’
ते पुढे म्हणाले, ‘‘सिंधुदुर्गात ६ सप्टेंबर २०२४ ला हजर झाल्यानंतर प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यावर भर दिला. अनेक वर्षे रखडलेला नरडवे प्रकल्प मार्गी लावला. तेथील बाधितांना भूखंड वाटप केले. आंबोली, गेळे, चौकुळ येथील कबुलायतदार प्रश्न मार्गी लावला. तेथील लोकांना भूखंड वाटप सुरू केले. वेंगुर्ले कॅम्प, गवळीवाडा येथील अतिक्रमित घरे कायम करण्यासाठी मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाचा स्वीकार केला आहे. ‘सिंधुरत्न’ योजनेतून शेतकरी, मच्छीमार, पर्यटक यांच्यासाठी विविध योजना राबविल्या. या योजनेतून उद्योजक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. नापणे येथे काचेचा पूल बांधून पर्यटनाला वेगळी चालना दिली. सावडाव धबधबा, आंबोली धबधबा येथे पर्यटकांसाठी सुविधा निर्माण केल्या.
जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नात वाढ होण्यासाठी आवश्यक प्रयत्न मी वर्षभरात केले. सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा असल्याने येथे मोठे उद्योग येऊ शकत नाहीत. त्यामुळे पर्यटन आधारित उद्योगाला चालना देण्याचे काम केले. सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग या दोन किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या ऐतिहासिक किल्ले संवर्गात झाला आहे. त्यामुळे भविष्यात जगभरातील पर्यटक येथे येणार आहेत. त्यासाठी सुविधा उपलब्ध करण्याचे काम आता प्रशासनाला करायचे आहे. सिंधुदुर्ग हा उत्पादक जिल्हा आहे. आंबा, काजू, नारळ, फणस यांसह अन्य उत्पादने येथे घेतली जातात. त्यामुळे प्रक्रिया उद्योगांना चालना देण्याचे काम केले.’’
...........................
चौकट
नियमात बदल करूनही
कायद्याचे पालन केले
लोकांची सेवा कशी चांगल्या पद्धतीने व वेळेत पूर्ण करता येईल, त्यांना लाभ कसा मिळेल, असा प्रयत्न मी माझ्या पूर्ण प्रशासकीय सेवेत केला. हे काम करताना नियमाच्या चौकटीत राहूनच केले. नियमाच्या बाहेर जाऊन काम करावे, अशी अपेक्षा नाही; परंतु थोडेसे इधर-उधर करावे लागते. सगळीच कामे नियमाप्रमाणे करता येत नाहीत. परिस्थितीनुसार व लोकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन त्यात बदल केले; परंतु कायद्याचेही पालन केले, असे एक सनदी अधिकारी म्हणून निवृत्त होताना जिल्हाधिकारी पाटील यांनी सांगितले.
..........................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फडणवीसांना अडचणीत आणायला जरांगेंना रसद पुरवताय का? शिंदे म्हणाले, मी लपून-छपून काही करत नाही

Chhagan Bhujbal : ओबीसी नेत्यांची आज मुंबईत बैठक, मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून आयोजन; जरांगेच्या मागणीला विरोध

राज्य सरकार घेणार ‘हे’ 2 मोठे निर्णय! 5 वर्षांत थकबाकीदार नसलेलाच यापुढे ग्रामपंचायत निवडणुकीस पात्र; ग्रामपंचायतीचा एकरकमी कर भरल्यास मिळणार 50 टक्के माफी

JP Nadda: गणेश उत्सवात शहराला भेट देणं माझं भाग्य, केंद्रीय मंत्री मुंबईतील गणरायाच्या चरणी नतमस्तक

Hotel Bhagyashree : जरांगेंचं आंदोलन सुरु असेपर्यंत हॉटेल भाग्यश्री बंद; आंदोलकांसाठी ट्रकभर शिधा मुंबईला पाठवला...

SCROLL FOR NEXT