कोकण

नारळाला विक्रमी दर

CD

88709

नारळाला विक्रमी दर
उत्पादन नीचांकीः बदलत्या वातावरणाबरोबरच वन्य प्राण्यांच्या उपद्रवाचा फटका
प्रशांत हिंदळेकर : सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १ : कोकणातील जीवनशैली आणि खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या नारळाच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. यंदा अवकाळी पावसामुळे तसेच माकडे आणि शेकरूंच्या उपद्रवाबरोबरच बदलत्या वातावरणामुळे नारळाचे उत्पादन घटले आहे. त्याचबरोबर नारळ काढण्यासाठी मजुरीचे वाढलेले दर यामुळे यावर्षी नारळाच्या दरांनी उच्चांक गाठला असून तो ६० रुपये एवढा झाला आहे.
यावर्षी पावसाचे चक्र पूर्णपणे बिघडले आहे. २० मे पासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मात्र, त्यानंतर जेव्हा पाऊस पडायला हवा होता, तेव्हा तो पडला नाही. ज्यावेळी पाऊस पडला तो सलग पडला तर बाकीच्या काळात दिवस कोरडेच राहिले. परिणामी अवकाळी पावसाचा पिकांना मोठा फटका बसला. याचा परिणाम केवळ नारळावरच नव्हे तर कोकमच्या पिकावरही झाला आहे. कोकमचे उत्पादन घटल्याने त्याचे दरही ४०० ते ५०० रुपये किलो एवढे झाले आहे. कोकणातील खाद्यसंस्कृतीमध्ये नारळ आणि कोकम दोन्ही महत्त्वाचे घटक आहेत आणि त्यांच्या किमती वाढल्यामुळे सामान्य गृहिणी आणि हॉटेल व्यावसायिकांचे बजेट पूर्णतः कोलमडले असल्याचे दिसून येत आहे. जिथे चार नारळांची गरज आहे, तिथे दोनच नारळांचा वापर करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.
नारळाच्या उत्पादनात घट होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे माकडे आणि शेकरूंचा वाढलेला उपद्रव. ही जनावरे कोवळी नारळे खाऊन टाकतात, ज्यामुळे नारळाचे उत्पादन फारच कमी झाले आहे. त्यामुळे आज नारळाची बागायती करणे हे आर्थिकदृष्ट्या न परवडणारी गोष्ट झाली आहे. याव्यतिरिक्त, नारळ काढण्यासाठी माडावर चढणाऱ्या मजुरांची संख्याही कमी झाली आहे आणि त्यांची मजुरी प्रचंड वाढली आहे. प्रति माड १०० रुपये मजुरी असल्याने नारळ काढून घेणे लोकांना परवडत नाही. त्यामुळे जे नारळ आपोआप खाली पडतात तेच गोळा करत त्याची साठवणूक केली जात आहे. यामुळे ताजे नारळ मिळणे दुर्मिळ झाले आहे.
स्थानिक नारळाचे उत्पादन घटल्यामुळे बाजारपेठेत केरळमधून येणाऱ्या नारळांची संख्या वाढली आहे. मात्र, या नारळाला स्थानिक नारळासारखी चव नसते आणि त्यातून मिळणारे खोबरेही कमी असते. त्यामुळे पदार्थांमध्ये स्थानिक नारळासारखी चव येत नाही. या सर्व कारणांमुळे नारळाचे दर ५० रुपयांवरून ६० रुपये झाले आहेत आणि त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. शहाळ्यांचे दरही १०० ते १५० रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

चौकट
शासनाच्या हस्तक्षेपाची गरज
कोकणातील शेती आणि फळबागायतीला वाचवण्यासाठी शासनाने तात्काळ हस्तक्षेप करणे आवश्यक आहे. केरळमध्ये नारळ, फणस, काजू आणि मसाल्यांच्या पिकांवर शास्त्रशुद्ध संशोधन झाले आहे. त्याच धर्तीवर कोकणातील वातावरणाला आणि शेतकऱ्यांच्या गरजांना अनुरूप संशोधन करणे गरजेचे आहे. केवळ पुस्तकी संशोधन न करता ते प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. शासनाने केवळ हस्तक्षेप न करता मदत आणि सहकार्याची भूमिका घ्यायला हवी.

कोट
केरळच्या धर्तीवर अभ्यास करून येथील वातावरणाशी स्थानिक शेतकऱ्यांच्या मानसिकतेची जुळवून घेणारे संशोधन येथे व्हायला हवे. भात शेतीच्या लागवड क्षेत्रात होत असलेली घट ही गंभीर बाब आहे. भविष्यात अनेक बागायतदार आपल्या जमिनी पडीक ठेवून त्या परप्रांतीयांच्या घशात घालतील अशी भीती असून हे एक मोठे संकट आहे. त्यामुळे शासनाने यात पुढाकार घेत प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून शेती माड बागायतीला आधार द्यायला हवा. जोपर्यंत प्रक्रिया उद्योग होत नाही आणि त्यासाठी बाजारपेठ आणि विक्री व्यवस्था होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना त्याचा कोणताही फायदा होणार नाही याचा गांभीर्याने विचार करता बाजारपेठ व विक्री व्यवस्था निर्माण होणे हाच त्यावरील एक शाश्वत उपाय आहे
- नितीन वाळके, हॉटेल व्यावसायिक

कोट
ऐन गणेशोत्सवात नारळाचे दरात मोठी वाढ झाली आहे. आज स्थानिक बाजारपेठेत ६० रुपये दराने प्रति नारळ उपलब्ध होता. मालवणी जेवणात नारळाच्या खोबऱ्याचा सर्रास वापर होतोच. शिवाय आता गणेशोत्सवात मोदक , करंज्या बनविण्यासाठी खोबऱ्याचा वापर केला जातो. त्यामुळे नारळाचे वाढलेल्या दरामुळे आमचे बजेट तर कोलमडलेच आहे. त्यामुळे जेवणातील खोबऱ्याच्या वापर कमी करण्याची वेळ आली आहे. अशी परिस्थिती ओढवली असली तरी गणेशोत्सवात मोदक, करंज्या हे प्रकार बनविणे महत्त्वाचे असल्याने नारळाचा दर कितीही वाढला तरी त्याची खरेदी आम्हाला खिशाला कात्री लावून करावीच लागणार आहे.
- मीरा म्हाडगुत, गृहिणी

कोट
ऐन गणेशोत्सवात नारळाच्या दरात झालेल्या वाढीमुळे आमचे महिन्याचे बजेटच विस्कळीत झाले आहे. सणासुदीच्या काळात नारळाच्या दरात झालेली वाढ ही गृहिणींना तापदायक बनली आहे. आपल्याकडे जेवणात किंवा कोणताही खाद्यपदार्थ बनविताना नारळाचा वापर केला जातो. त्यामुळे आता जेवणात नारळाचा वापर मन मारून करावा लागणार आहे. गणेशोत्सवात मोदक तसेच जेवणासाठी नारळाचा वापर केला जातो. त्यामुळे वाढलेल्या नारळाच्या दराचा फटका सर्वच गृहिणींना बसणार आहे.
- महिमा मयेकर, गृहिणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जरांगेंना मुंबई सोडावी लागणार? पोलिसांनी पाठवली नोटीस, कोर्टात दुपारी महत्त्वाची सुनावणी

OBC Reservation: उद्यापासून ओबीसी संघटनांचे ‘इशारा आंदोलन’; आरक्षणाच्या संरक्षणासाठी नागपूर विभागात आंदोलन होणार

Pune Road Accident : पुण्यात भीषण अपघात; सिमेंट मिक्सर ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जागीच मृत्यू; अंगावरून चाक गेलं अन्...

Nestle CEO: ऑफिसमध्ये CEOचे ज्युनियर सोबत अफेअर; मोजावी लागली मोठी किंमत, 913 कोटींची नोकरी गमावली

भूस्खलनात अख्खं गाव गाडलं गेलं, किमान १ हजार जणांचा मृत्यू, एकटाच वाचला; वेस्टर्न सुदानमधील घटना

SCROLL FOR NEXT