- rat११p१०.jpg-
P२५N९०७६६
रत्नागिरी-दादर पॅसेंजर
‘रत्नागिरी-दादर’साठी २ ऑक्टोबरला उपोषण
जल फाउंडेशनचे रेल्वे व्यवस्थापकांना निवेदन ; मुंबईतून येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ११ : कोकण रेल्वे, मध्यरेल्वेकडे रत्नागिरी-दादर पॅसेंजर व मुंबई-चिपळूण अशा दोन नवीन रेल्वेगाड्या सुरू करा अन्यथा २ ऑक्टोबरपासून लाक्षणिक उपोषण करण्यात येईल, असा इशारा जल फाउंडेशन कोकण विभाग अध्यक्ष नितीन जाधव यांनी दिला आहे. हे निवेदन मध्यरेल्वे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना व मुंबई विभागीय रेल्वे व्यवस्थापक हिरेश मीना यांना देण्यात आले.
गेल्या चार वर्षांपासून मध्यरेल्वेकडे कोकण विभागासाठी व प्रवाशांच्या हितासाठी रत्नागिरी-दादर व मुंबई-चिपळूण या रेल्वेगाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री, रेल्वे प्रशासन व विविध लोकप्रतिनिधी यांच्याकडे सतत पाठपुरावाही केला आहे; परंतु याकडे अद्याप लक्ष दिलेले नाही. १९९६ पासून कोकण रेल्वेमार्गावर सुरू असलेली व मध्यरेल्वेने मार्च २०२० पासून अचानक बंद केलेली रत्नागिरी-दादर पॅसेंजर पूर्वीप्रमाणेच दादरपर्यंत चालवावी, अशी मागणी प्रवाशांकडून सतत होत आहे तसेच मुंबई व चिपळूणदरम्यान द्वितीय श्रेणी आरक्षित, वातानुकूलित चेअरकार व सामान्यांसाठी अनारक्षित डबे असलेली रेल्वेगाडी सुरू करा, अशीही मागणी आहे. ही गाडी पहाटे किंवा सकाळी लवकरच मुंबईतून सुटून चिपळूणहून दुपारी किंवा सायंकाळी मुंबईकडे सोडावी. ही गाडी नमो भारत रॅपिड रेलरॅकने चालवल्यास प्रवाशांना फायदा होऊ शकतो. रत्नागिरी-दादर पॅसेंजर दिव्यापर्यंत असल्यामुळे अनेकांना लोकल रेल्वेचा प्रवास करावा लागतो. याचा सर्वाधिक फटका सण-उत्सवावेळी तसेच गर्दीच्यावेळी प्रवाशांना बसतो. याकडे सतत दुर्लक्ष होत असल्याने जल फाउंडेशनने २ ऑक्टोबरपूर्वी पॅसेंजरबाबत निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.
चौकट
रेल्वेगाड्यांमधून प्रवास करणे मुश्कील
रत्नागिरी, सिंधुदुर्ग किंवा दक्षिण भारतातून येणाऱ्या रेल्वेगाड्या गर्दीने भरून येतात. त्यामुळे रत्नागिरीच्या पुढील रेल्वेस्थानकामधील लोकांना रेल्वेगाड्यांमध्ये चढणे मुश्कील होते. याची दखल घेऊन मध्यरेल्वेने चिपळूण-दादर अशी नवी रेल्वेगाडी सुरू करावी. ही गाडी कोकण रेल्वेच्या सर्व स्थानकावर थांबणारी दैनिक गाडी असावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.