92858
आम्हीही माणसंच; रोज घाणीत, जेवणही जात नाही!
स्वच्छता कामगारांची व्यथा; पीएफ स्वरुपातील कष्टाची कमाई ठेकेदाराने बुडविली
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २० ः आम्ही रोज घाणीत काम करतो. त्यामुळे आम्हाला दुपारचे जेवणही जात नाही. आम्हीसुद्धा माणसं आहोत. आमच्या मुलांचे शिक्षण आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी कोणतीही तक्रार न करता काम करतो. मात्र, आमच्या कष्टाचे पैसे ठेकेदार खात असतील, तर ते योग्य नाही. जर आम्हाला असा त्रास दिला, तर भविष्यात हे घाणीचे काम कोणीही करायला तयार होणार नाही, अशा भावना कंत्राटी सफाई कामगार संघटनेचे बाबू बारागडे यांनी व्यक्त केल्या आहेत. याबाबत त्यांनी प्रसिद्ध पत्रक दिले आहे.
त्यांनी सफाई कामगारांच्या व्यथा मांडल्या आहेत. त्यानी म्हटले आहे की, गेली चार वर्षे आम्ही आमच्या हक्काच्या पैशांसाठी झगडत आहोत. सुमारे ७० सफाई कर्मचाऱ्यांचा सुमारे ६५ लाख रुपयांचा भविष्य निर्वाह निधी ठेकेदाराने बुडवला आहे. हा निधी मिळवण्यासाठी आता संघर्ष करणार आहोत. या संघर्षामध्ये आम्हाला न्याय मिळाला नाही, तर भविष्यात कोणीही हे काम करायला तयार होणार नाही. आमची व्यथा समजून घेत प्रशासनाने व जनतेने आम्हाला सहकार्य केले, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. आम्ही खऱ्या अर्थाने या शहराचे स्वच्छतादूत आहोत. मात्र, ठेकेदारासह एक साखळी आमचा भविष्य निर्वाह निधी लुटत आहे आणि त्यात आम्ही ७० कामगार अडकलो आहोत. आम्हाला यातून बाहेर काढण्यासाठी १५ दिवसांत कामगार संघटना, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगरसेवक विलास जाधव आणि सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न करणार आहोत. यात नक्कीच न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी
व्यक्त केला आहे.
..................
कोट
92800
सफाई कामगारांचे यापुढे असे हाल होऊ नयेत. प्रशासनाने ठेकेदारांकडून आमची कमाई परत मिळवून द्यावी. आम्हाला कामावरून काढून टाकण्याची भाषा वापरणाऱ्या अशा ठेकेदारांना प्रशासनाने आणि जनतेने या शहरातून कायमस्वरुपी बाजूला करावे. हा दिवस आमच्या आयुष्यातील सर्वांत मोठा आनंदाचा दिवस असेल. आमच्या आंदोलनामुळे शहरातील जनतेला थोडा त्रास झाला असेल. मात्र, आमच्या वेदना त्याच जनतेला माहीत आहेत, ज्यांच्या सेवेसाठी आम्ही नेहमीच त्यांच्या घरी पोहोचतो. ठेकेदाराबद्दल आमच्या मनात काहीही वाईट भावना नाही. मात्र, आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण आणि वृद्ध आई-वडिलांच्या औषधांचा खर्च भागवण्यासाठी आम्हाला आमच्याच घामाच्या पैशांसाठी झगडावे लागत आहे, हे दुर्दैव. वेळ मिळाल्यास एकदा तरी आमच्या घरी येऊन आमची परिस्थिती पाहावी.
- बाबू बारागडे, कंत्राटी सफाई कामगार संघटना
----
कामगारांना बळ देऊ ः साळगावकर
सावंतवाडी ः शहरातील नगरपालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांच्या प्रश्नावर आणि त्यांच्या न्याय हक्काची लढाई कायद्याने लढली जाणार आहे. थोडा वेळ जाईल, मात्र, हा लढा आम्ही निश्चितच लढू, अशी भूमिका माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी मांडली आहे. साळगावकर यांनी यासंदर्भात पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्यात त्यांनी असे म्हटले की, पालिकेच्या एकाही कंत्राटी सफाई कामगाराला कमी केलेले नाही. सर्व कामगार कामावर रुजू आहेत आणि काम करत आहेत. यासंदर्भात पालिकेच्या आरोग्य विभागाकडून माहिती दिली आहे. मात्र, कुठल्याही कंत्राटी कामगारावर कारवाई होणार नाही, याची दक्षता संघटनेच्या माध्यमातून घेणार आहोत. संघटनेचे बळ आम्ही त्यांच्या पाठीशी देणार आहोत. ही लढाई आता कायद्यानेच लढली जाणार आहे. मात्र, कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना त्यांचा न्याय हक्क मिळवून देणार आहोत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.