कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पावरुन खडाजंगी
लांजा नगरपंचायतीत संयुक्त बैठक; साखळी उपोषण ३८ व्या दिवशीही सुरूच
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. २१ः शहरातील कोत्रेवाडी येथील घनकचरा प्रकल्पाविरोधात गेले ३८ दिवस सुरू असलेल्या साखळी उपोषणाच्या पार्श्वभूमीवर लांजा नगरपंचायतीत विशेष बैठक झाली. बैठकीत प्रशासन आणि कोत्रेवाडी ग्रामस्थांमध्ये काही मुद्द्यांवरुन जोरदार खडाजंगी झाली. कोत्रेवाडी ग्रामस्थांनी पुन्हा ठामपणे भूमिका मांडत घनकचरा प्रकल्प कोत्रेवाडी येथे होऊ देणार नाही, प्रकल्प तातडीने रद्दच व्हावा, अशी मागणी केली.
बैठकीत नागरिकांची घनकचरा प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीचे पत्र मुख्याधिकारी यांच्यावतीने मंत्रालयातील नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांना पाठविण्यात आले. घनकचरा प्रकल्पाची प्रक्रिया पूर्णपणे बेकायदेशीर असून भूसंपादन चुकीच्या पद्धतीने झाले असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. प्रकल्पाच्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही. कोत्रेवाडीतील जमिनीपासून घरे १२० मीटरच्या अंतरावर आहेत. बारमाही जिवंत पाण्याचा ओढा आहे. लगत १० विहिरी व सार्वजनिक विहीर आहे. या क्षेत्रात किमान १५०० वृक्ष आहेत. तसेच हा ओढा लांजा शहरातून वाहणार्या बेनी नदीला मिळतो. त्यामुळे वस्ती असणार्या ७४ घरे व १२५ कुटुंबांचा जीवन मरणाचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे हा घनकचरा प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी उपोषण करणाऱ्या ग्रामस्थांनी केली आहे. ही जागा निश्चित करण्यासाठी दुसरी समिती नेमण्यात आली. मात्र ती नियमबाह्य पद्धतीने नेमण्यात आली असून पहिल्या समितीने व जिल्हाधिकारी यांनी सदर प्रस्ताव रद्द केलेला असूनही दुसरी समिती नेमण्यात आली. पहिल्या समितीच्या अहवालाप्रमाणे घनकचरा प्रकल्पाची जागा रद्द करावी, असे निवेदनात म्हटले आहे.
बैठकीला नगरविकास जिल्हा सहआयुक्त तुषार बाबर, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजित कुंभार, पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे आदी उपस्थित होते. बैठकीत आंदोलनकर्त्या नागरिकांकडून मंगेश आंबेकर व काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी अशोक जाधव यांनी बाजू मांडली.
चौकट
निर्णय होईपर्यंत साखळी उपोषण सुरुच
बैठकीत झालेल्या चर्चेदरम्यान नागरिकांच्या ठाम भूमिकेमुळे प्रकल्पासंदर्भातील तोडगा काढण्याची जबाबदारी पुन्हा एकदा प्रशासनावर आली आहे. याबाबत निर्णय होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.