95762
कास ः येथे परिपक्व झालेले भात खाताना ओंकार हत्ती.
95764
मडुरा ः दुसऱ्या छायाचित्रात अधिकाऱ्यांना जाब विचारताना ग्रामस्थ. (छायाचित्रे- नीलेश मोरजकर)
मडुरा परिसर ‘ओंकार’च्या दहशतीखाली
शेती पायदळी; ठोस उपाय नसल्याने वनअधिकाऱ्यांना घेराओ
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ३० ः मडुरा, कास व सातोसे परिसरातील शेतकऱ्यांवर गेल्या चार दिवसांपासून ओंकार हत्तीचे संकट कोसळले आहे. या हत्तीने शेतातील उभ्या पिकांची प्रचंड नासधूस केली असून, शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास अक्षरशः पायाखाली तुडवला जात आहे. ग्रामस्थांनी वारंवार वनविभागाचे लक्ष वेधूनही ठोस उपाययोजना न झाल्याने संतापाची लाट उसळली आहे. केवळ फटाके लावणे आणि पाळत ठेवणे एवढ्यापुरतीच विभागाची कार्यवाही मर्यादित असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
ग्रामस्थांनी आज मडुरा काळाआंबा येथे एकत्र येत वन अधिकाऱ्यांना घेराओ घातला. आमची शेती, उपजीविकेचे साधन उद्ध्वस्त होत आहे. आता आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी दिला. यावेळी मडुरा माजी सरपंच सुरेश गावडे, कास सरपंच प्रवीण पंडित, कास तंटामुक्ती समिती अध्यक्ष बाबू पंडित यांच्यासह असंख्य ग्रामस्थ शेतीसह कुटुंबाच्या संरक्षणासाठी घटनास्थळी हजर होते. दुपारी १२.३० वाजेपर्यंत कोणताही वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचला नव्हता.
गोवा-तांबोसे येथे ओंकार हत्ती आला होता, त्यावेळी गोवा वनमंत्री तसेच मुख्यमंत्री स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवून होते, असे सांगण्यात आले; मात्र स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी अजूनही घटनास्थळाला भेट दिली नसल्याने ग्रामस्थ अधिकच संतप्त झाले आहेत. आपल्या भागातील जनतेच्या अडचणींची स्थानिक आमदार दखल घेत नाहीत, असे ग्रामस्थांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
...................
अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार
वन कर्मचारी आपापल्या परीने हत्तीवर लक्ष ठेवून आहेत; परंतु वरिष्ठ पातळीवरून कोणताही ठोस निर्णय घेतला जात नसल्यामुळे परिस्थिती गंभीर होत चालली आहे. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत असून, त्यांच्या जीवनालाही धोका निर्माण झाला आहे. वनमंत्र्यांनी तातडीने याकडे लक्ष देऊन या हत्तींचा बंदोबस्त करावा; अन्यथा ग्रामस्थ तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबतील, असा इशारा रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे यांनी दिला.
...................
कोट
ओंकार हत्तीमुळे उद्भवलेले हे संकट केवळ शेतकऱ्यांच्या उपजीविकेला नाही, तर त्यांच्या सुरक्षेलाही धोका पोहोचवत आहे. ग्रामस्थांचा संताप दिवसेंदिवस वाढत असून, आता प्रशासनाने गंभीरतेने दखल घ्यावी.
- प्रवीण पंडित, सरपंच, कास
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.