N96898
मालवण ः येथे पत्रकार परिषदेत माहिती देताना भाजप शहराध्यक्ष बाबा मोंडकर. (छायाचित्र ः प्रशांत हिंदळेकर)
मालवणसाठी जिल्हा नियोजनमधून १४ कोटी
बाबा मोंडकर ः विकास निधी आणण्याचे श्रेय भाजपलाच
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ६ः लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांचे योगदान आणि स्थानिक जनतेच्या पाठिंबामुळे केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आले. जनतेला अपेक्षित विकास साधण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना सन्मान देण्यासाठी पालकमंत्री नीतेश राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा नियोजनमधून मालवण तालुक्यासाठी सुमारे १४ कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर झाल्याबद्दल श्री. राणे यांचे अभिनंदन करण्यात आले, अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष बाबा मोंडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, मित्रपक्षांकडून कामाचे श्रेय घेतले जात असले तरी हा विकास निधी आणण्याचे श्रेय हे खासदार नारायण राणे व जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनाच जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
येथील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी सुदेश आचरेकर, गणेश कुशे, बाबा परब, मंदार केणी, यतीन खोत, आबा हडकर, सचिन आंबेरकर, जीवन भोगावकर, पंकज सादये, ललित चव्हाण, मिलिंद झाड, श्याम झाड, रवींद्र टेंबुलकर, अन्वेशा आचरेकर, सेजल परब, पूजा करलकर, राणी पराडकर उपस्थित होते.
श्री. मोंडकर म्हणाले, ‘‘पालकमंत्री राणे यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजनमधून मालवण तालुक्यासाठी १४ कोटींपेक्षा जास्त थेट निधी प्राप्त झाला आहे. मालवण शहर आणि वायरी भूतनाथ जिल्हा परिषद गट या गटासाठी पहिल्या टप्प्यात ४ कोटी ७० लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. मंजूर झालेल्या कामांची प्रक्रिया पालकमंत्री राणे स्थानिक तालुकाध्यक्ष यांच्या माध्यमातून जिल्हाध्यक्षांना सूचना देऊन आणि त्यांच्यामार्फत पालकमंत्र्यांनी मंजूर करण्याची होती. त्यामुळे या सर्व विकास कामांचे १०० टक्के क्रेडिट हे खासदार नारायण राणे आणि जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनाच जाते. कारण ही सर्व कामे त्यांच्या सूचनेनुसारच मंजूर झाली आहेत.’’ या कामांचे श्रेय मित्र पक्षांकडून घेतले जात असले तरी या कामांचे प्रस्ताव भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सुचवल्यानुसारच केले होते. याबाबतचे पुरावेही श्री. मोंडकर यांनी सादर केले.
ते पुढे म्हणाले, ‘‘जिल्हा नियोजनमधून प्राप्त झालेल्या निधीमध्ये मालवण शहरासाठी पहिल्या टप्प्यात नगरोत्थानमधून दोन कोटी ६५ लाख रुपये इतका भरीव विकास निधी प्राप्त झाला आहे. यामध्ये शहराची पर्यटनाची ओळख अजून दृढ व्हावी यासाठी पर्यटन पूरक प्रवेशद्वार उभारण्यासाठी १५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. शहरात रिक्षा व्यवसायाचे पर्यटनातील योगदान लक्षात घेऊन केरळ, कर्नाटकच्या धर्तीवर पर्यटन पूरक रिक्षा स्टॅन्ड बनवण्यासाठी १० लाख रुपये मंजूर झाले आहेत. पर्यटन पूरक लाईट व्यवस्था अधिक सुधारण्यासाठी ७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. शहरातील देऊळवाडा पूल येथे आकर्षक पद्धतीचे रेलिंग बसवण्यासाठी ७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. दलित वस्तीतील नागरिकांच्या मागणीनुसार व्यायाम शाळा उभारण्यासाठी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. शहरातील नादुरुस्त गटार व्यवस्था आणि काही करविंग पॉईंट्स विकसित करण्यासाठी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. वायरी भूतनाथ जिल्हा परिषद गटामध्ये पर्यटन आणि मच्छीमार समाजासाठी विशेष लक्ष केंद्रित केले आहे.’’
---
जेटी बांधण्यासाठी २२ लाख रुपये मंजूर
श्री. मोंडकर म्हणाले, ‘‘वायरी समुद्रकिनाऱ्यावरील मोरेश्वर देवस्थानाकडे पर्यटनपूरक सुविधा निर्माण करण्यासाठी आणि मच्छीमारांसाठी जेटी बांधण्यासाठी २२ लाख रुपये मंजूर केले आहेत. जाधववाडी रामदास मठ रेवंडकर पानंद येथील मासळी वाहतुकीसाठी रस्ता बनवण्यास २५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. निशानकाठी येथे पर्यटन पूरक विकास करण्यासाठी ७ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तारकर्ली बंदर जेटीवर खाडी किनारा भाग सावंतवाडी तलावासारखा विकसित करण्यासाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. मच्छीमारांच्या मागणीनुसार निवारा शेड उभारण्यासाठी ५ लाखांचा निधी मंजूर आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.