रानडुकरांचे थैमान
खेड : तालुक्यातील ऐनवरे परिसरात रानडुकरांनी अक्षरशः थैमान घातले आहे. सततच्या पावसामुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांच्या भातशेतीवर आता जंगली प्राण्यांनी हल्ला चढवला आहे. शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले जात आहे. ऐनवरे येथील शेतकरी सुरेश पोफळकर यांच्यासह परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात रानडुकरांनी अक्षरशः मळणी करून टाकली आहे. शेतीचा सगळा पसारा उद्ध्वस्त झाला असून, शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणि मनात प्रचंड संताप आहे. पंचक्रोशीतील ऐनवरे, कुळवंडी, तिसंगी, माणी, सवेणी आणि हेदली या गावांतील शेतकरी या संकटाने हैराण झाले आहेत. तरीसुद्धा कृषी विभाग आणि वनविभागाचे अधिकारी अद्याप गावात फिरकलेले नाहीत, असे स्थानिक ग्रामस्थांचे मत आहे. शेतकऱ्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली असून, तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
आंबडसमध्ये
कीर्तन महोत्सव
खेड ः तालुक्यातील काडवली येथील श्री गुरूमाऊली सामाजिक सेवा संस्थेच्यावतीने ६ ते ८ डिसेंबरदरम्यान आंबडस येथे जनकल्याण कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या ५ वर्षांपासून कीर्तन महोत्सवातून परमार्थिक क्षेत्रातून समाजकल्याणाचा वारसा जोपासला जात असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष राकेश मोरे यांनी दिली. कोकणातील वारकरी शिक्षणसंस्था येथे दिमाखात सुरू झाली आहे. आंबडस, केळणे, शेल्डी, भेलसई, चिरणी, लोटे पंचक्रोशीसह चिपळूण, खेड, संगमेश्वर, दापोली, रत्नागिरी, जिल्ह्यातील सर्व वारकरी, फडकरी, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील लोकांच्या योगदानातूनच हे साध्य झाले आहे. या पार्श्वभूमीवर जनकल्याण कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. जनार्दन आंब्रे यांच्या आशीर्वादाने मृदुंग सम्राट पांडुरंग सुतार, प्रशांत पवार, माजी सैनिक राजाराम कदम, सुधाकर चाळके, सुरेश माने, सुशांत जाधव, संत निरंकारी मिशनशी जोडलेले नवनाथ मायनाक आणि सर्व परमार्थिक ज्येष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी कीर्तन महोत्सवाचे आयोजन करून कीर्तनसेवा जपली जात आहे. या महोत्सवात बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.