swt3017.jpg
01408
कुडाळ ः येथील नगरपंचायत हद्दीतील एमआयडीसी येथे नगरपंचायतीच्या प्रस्तावित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाबाबत उद्योजक व स्थानिक यांच्याशी चर्चा करताना आमदार निलेश राणे. (छायाचित्र ः अजय सावंत)
घनकचरा प्रकल्प २१ व्या शतकातील मॉडेल
आमदार निलेश राणेः नागरिकांना त्रास होऊ देणार नसल्याचे आश्वासन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ३०ः येथील एमआयडीसीत प्रस्तावित असलेला नगरपंचायतीचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प हा २१ व्या शतकातील मॉडेल प्रकल्प असून, या प्रकल्पामुळे कोणालाही कसलाही त्रास होणार नाही, याचे आश्वासन मी देतो. प्रकल्पाचे सविस्तर सादरीकरण तुमच्यासमोर ठेवले जाईल. तुमचे नुकसान होऊ देणार नाही. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे, असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी रहिवाशी नागरिकांना केले. त्यामुळे गेली बरीच वर्षे रखडलेल्या या प्रकल्पाला आमदार राणेंमुळे पूर्णविराम मिळाला आहे. त्यांच्या हस्ते संरक्षक भिंत बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.
येथील नगरपंचायत हद्दीतील एमआयडीसी येथे नगरपंचायतीच्या प्रस्तावित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या संरक्षक भिंत बांधकामाचा भूमिपूजन समारंभ नगरपंचायत प्रशासनाकडून आयोजित करण्यात आला होता. याबाबतची माहिती मिळताच स्थानिक उद्योजक आणि रहिवाशी नागरीकांनी या प्लॉटच्या समोर रस्त्यावर एकवटत या प्रकल्पाला विरोध दर्शवला. याबाबतची माहिती मिळताच कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी घटनास्थळी धाव घेत रहिवासी नागरिकांशी चर्चा करीत सहकार्य करण्याची विनंती केली. तसेच काही नगरसेवकांनीही जाऊन त्या नागरिकांशी चर्चा करीत, या प्रकल्पामुळे कोणताही त्रास होणार नाही, असे सांगत सहकार्य करण्याची विनंती केली. परंतु, नागरिक आपल्या भूमिकेवर ठाम राहीले. त्यानंतर त्या रहिवाशी नागरीकांच्या प्रमुख शिष्टमंडळाने आमदार राणे यांची एमआयडीसी येथील शासकीय विश्रामगृह येथे भेट घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी आमदार राणे यांनी या प्रकल्पामुळे कोणताही त्रास परिसरातील नागरिक तसेच उद्योगांना होणार नाही, याची आपण आमदार म्हणून आश्वासन देतो, असे सांगून सहकार्य करण्याची विनंती केली. त्यानंतर शिष्टमंडळाने सकारात्मक प्रतिसाद दिला.
काही वेळातच आमदार राणे या प्रकल्पाच्या संरक्षक भिंत बांधकामाच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी एमआयडीसीतील त्या प्लॉटकडे दाखल झाले. मात्र, भूमिपूजन करण्यापूर्वी तेथे जमलेल्या स्थानिक रहिवाशी नागरिक व उद्योजकांशी आमदार राणे यांनी भेट घेतली. तेव्हा काही उपस्थितांनी आमचा प्रकल्पाला विरोध नाही, पण या परिसरात अनेक उद्योग, महाविद्यालय, हॉस्पीटल व लोकवस्ती असून या प्रकल्पामुळे त्रास होऊ शकतो, अशी भिती व्यक्त केली. या प्रकल्पासाठी हिच जागा का निवडण्यात आली? अन्यत्रही खूप जागा आहेत, तेथे हा प्रकल्प का नेला नाही? असे अनेक प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले. त्यावर आमदार राणे यांनी या प्रकल्पासाठी या जागेचे नोटीफीकेशन मी आमदार व्हायच्या आधीच झालेले. मी फक्त निधी मंजूर करून आणला आहे. शिवाय हा प्रकल्प एक दर्जेदार प्रकल्प आहे. २१ व्या शतकातील हा मॉडेल प्रकल्प असून, एक टक्काही दुर्गंधी बाहेर येणार नाही किंवा कोणालाही कसलाही त्रास होणार नाही, याची १०० टक्के गॅरेंटी मी तुम्हाला देतोय. जर एक टक्का जरी दुर्गंधी बाहेर आली किंवा तुम्हा नागरिकांना त्रास झाला तर त्याला मी स्वतः जबाबदार आहे. जर मी खोट सांगत असेन तर तुम्ही कधीही मला परत हक्काने सांगा. तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही. तुमच्या सोबतच मी आहे. तुम्हाला त्रास होऊ देणार नाही. तुम्हाला धोक्यात टाकणार नाही. आणि जर तसे तुम्हाला काही वाटलंच तर मला सांगा निलेश राणे तुमच्या पुढे उभा राहील, मागे उभा राहणार नाही, तुमच्याच बाजूचा निर्णय घेतला जाईल, एवढ मी तुम्हाला आज १०० टक्के सांगतो. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे, अशी विनंती आमदार राणे यांनी नागरिकांना केली. त्यावर नागरिकांनीही सहकार्याची भूमिका घेत, या प्रकल्पाचे प्रेझेंटेशन दाखविण्याची मागणी केली. आमदार राणे यांनीही तांत्रिक टिमच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना एकत्र बसून सविस्तर प्रेझेंटेशन दाखवले जाईल, अशी ग्वाही दिली. त्यानंतर आमदार राणे यांच्या हस्ते या प्रकल्पाच्या संरक्षक भिंत बांधकामाचा भूमिपूजन समारंभ पार पडला. यावेळी यावेळी संजय आंग्रे, संजय पडते, दादा साईल, नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, आनंद शिरवलकर, दीपलक्ष्मी पडते, विनायक राणे, नगरसेवक विलास कुडाळकर, अभी गावडे, अॅड. राजीव कुडाळकर, गणेश भोगटे, नगरसेविका चांदणी कांबळी, श्रृती वर्दम, ज्योती जळवी आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.