राष्ट्रवादी प्रभागात जाऊन उमेदवार निवडणार
मिलिंद कापडी ः चिपळूणमध्ये 28 जागांसाठी 63 अर्ज
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. 6 : येथील पालिकेच्या निवडणुकीसाठी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुकांमध्ये स्पर्धा पाहायला मिळत आहे. 28 जागांसाठी 63 अर्ज आले आहेत; परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्लमेंटरी बोर्ड प्रभागात जाऊन ऑन दी स्पॉट उमेदवारांची निवड करणार आहे, अशी माहिती पक्षाचे शहराध्यक्ष मिलिंद कापडी यांनी ‘सकाळ’ला दिली.
चिपळूण पालिकेत 14 प्रभागातून 28 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. महायुतीचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार अंतिम झालेला नाही. तो वरिष्ठ पातळीवर ठरेल, असे सांगितले जात आहे; मात्र तयारी तिन्ही घटकपक्षांची सुरू आहे. भाजपकडे नगराध्यक्षपदासाठी ७ जणं इच्छुक आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे एक तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे दोघेजण इच्छुक आहेत. नगरसेवक पदासाठी भाजपकडे 65 इच्छुकांनी अर्ज केले आहेत. आचारसंहिता लागल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्येही अनेकांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. शहरातील राष्ट्रवादीच्या संपर्क कार्यालयात इच्छुकांसाठी अर्ज उपलब्ध करण्यात आले आहेत. 10 नोव्हेंबरपर्यंत ६३ जणांनी अर्ज दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत आहे. पक्षाकडून ताकद मिळेल, या आशेने अनेकांनी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे अर्ज देण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. इच्छुकांची नावे समोर आल्यानंतर त्यातून अंतिम उमेदवार निवडला जाणार आहे. उमेदवार निवडताना या वेळी पक्षाने वेगळी शक्कल लढवली आहे. घराणेशाही तसेच पक्षाच्या रसदीवर अवलंबून न राहता मतदार आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मत त्या उमेदवाराबद्दल काय आहे, याची पडताळणी करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ प्रत्येक प्रभागात जाऊन पक्षाच्या कार्यकर्त्यांची मतं समजून घेणार आहे. तो उमेदवार निवडून येऊ शकतो का, प्रभागात त्याच्याबद्दल जनमत काय आहे, याची चौकशी होईल. त्यानंतर जागेवरच उमेदवार जाहीर केला जाईल. चिपळूण पालिकेच्या निवडणुकीत प्रथमच उमेदवार निवडण्यासाठी अशी पद्धत राबवली जात आहे.
..........
कोट
पक्षाकडे अनेकांनी उमेदवारी मागितली आहे. दहा तारखेपर्यंत इच्छुकांचे अर्ज घेतले जातील. अकरा तारखेला मुलाखती होतील त्यानंतर प्रभागात जाऊन उमेदवारांबद्दलचे जनमत आजमावले जाईल. त्यानंतर उमेदवार ठरेल. महायुती झाली तर ज्या जागा वाट्यात तेथील उमेदवारांना संधी दिली जाईल.
- मिलिंद कापडी, शहरप्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
...........
चौकट
शिवसेनेकडे 70 अर्ज
माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयात आज शिवसेनेच्यावतीने निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. नगरसेवकपदासाठी 70 जणांनी अर्ज केल्याचे माजी आमदार आणि उपनेते सदानंद चव्हाण यांनी सांगितले. महायुती झाल्यानंतर अंतिम उमेदवार निवडले जातील, असे त्यांनी सांगितले.