swt618.jpg
02824
सावंतवाडी ः येथे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, विलास जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांचे स्वागत करताना प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, प्रभाकर सावंत, विशाल परब.
माजी नगराध्यक्ष साळगावकर भाजपमध्ये
सावंतवाडी, ता. ६ ः येथील माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगरसेवक विलास जाधव यांनी सहकाऱ्यांसह बुधवारी (ता. ५) रात्री भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी त्यांचे भाजपमध्ये स्वागत केले. यावेळी प्रभाकर सावंत, विशाल परब, अॅड. अनिल निरवडेकर उपस्थित होते. एकेकाळी आमदार दीपक केसरकर यांचे सहकारी राहिलेल्या श्री. साळगावकर यांनी गेल्या काही वर्षांपासून केसरकर यांच्याशी फारकत घेतली होती. ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. बुधवारी रात्री श्री. चव्हाण यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेत प्रवेश केला. श्री. साळगावकर यांनी तब्बल दोनवेळा सावंतवाडी नगरपालिकेचे नगराध्यक्षपद भूषविले होते. दुसऱ्या टर्ममध्ये त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नगराध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा सावंतवाडी नगराध्यक्षपदाची निवडणुकीही लढवली होती. परंतु, त्यावेळीही त्यांचा पराभव झाला होता. गेली अनेक वर्ष ते सक्रिय राजकारणापासून काहीसे लांबच होते. गेल्या काही दिवसांपासून ते भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा होती.