02827
कवी अजय कांडर यांच्याकडून १०० ग्रंथ भेट
साहित्यिक संजय तांबे, मधुकर मातोंडकर, हरिश्चंद्र भिसे यांची उपस्थिती
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ६ : दोडामार्ग येथील वाचक आणि सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक एस. के. गवस यांना कवी अजय कांडर यांनी १०० ग्रंथ भेट दिले. यावेळी साहित्यिक संजय तांबे, मधुकर मातोंडकर आदी उपस्थित होते.
दोडामार्ग शिरवल येथील एस. के. गवस (वय ९२) यांना वाचनाची प्रचंड आवड आहे. गेल्या काही वर्षांत वृद्धापकाळामुळे त्यांना बाहेर जाऊन ग्रंथ खरेदी करणे शक्य होत नव्हते. जिल्ह्यातील साहित्यिक संजय तांबे यांना संपर्क साधून गवस यांनी वाचनाची होणारी अबाळ स्पष्ट केली. तसेच आपल्या सोबत कुणी नसल्याने बाहेरून ग्रंथ आणता येत नसल्याचीही बाब त्यांनी सांगितली. ही बाब समजताच कणकवलीतील कवी अजय कांडर यांनी तांबे, मधुकर मांतोंडकर यांच्यासमवेत दोडामार्ग-शिरवल येथे जाऊन वाचक गवस यांना शंभर ग्रंथ भेट म्हणून दिले. त्यावेळी तांबे आणि हरिचंद्र भिसे यांनीही त्यांची प्रकाशित झालेली पुस्तकेही गवस यांना भेट दिली. श्री. गवस हे मुंबई येथे पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. निवृत्तीनंतर ते गावी दोडामार्ग-शिरवल येथे राहत आहेत.