- rat६p१५.jpg-
P२५O०२७७७
राजापूर ः राजापूर नगरपालिका
महायुती, महाविकास आघाडीबाबत संभ्रम
राजापूर नगरपालिका ; मित्रपक्षांच्या एकत्रित बैठकांची इच्छुकांना प्रतीक्षा
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ६ ः राजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, नव्या प्रभागरचनेत प्रभागांसह नगरसेवकांची संख्या वाढताना प्रभागरचनाही बदलली आहे. गेल्या दोन-तीन वर्षात अनेक राजकीय स्थित्यंतरे झाली असून, कार्यकर्त्यांचेही पक्षांतर झाले आहे. स्थानिक पातळीवर महायुती व महाविकास आघाडीतील मित्रपक्षांच्या एकत्रित बैठकाही झालेल्या नसल्याने सर्वांमध्येच संभ्रम आहे. त्यामुळे उमेदवारी निश्चित करण्यासह बहुमताच्या विजयाचे समीकरण जुळवणे सर्वच राजकीय पक्षांसमोर आव्हान आहे.
विविध कारणांमुळे रखडलेल्या नगरपालिकेच्या निवडणुका अखेर जाहीर झाल्या आहेत. राजापूर शहरामध्ये निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. येत्या १० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांकडून उमेदवारी निश्चितीसाठी चाचपणी सुरू करण्यात आली आहे तर, इच्छुक उमेदवारांकडून आपल्या ‘गॉडफादर’च्या माध्यमातून स्वपक्षाकडून उमेदवारी निश्चितीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. एका बाजूला इच्छुक उमेदवारांसह राजकीय पक्षांनी निवडणूक मोर्चेबांधणी सुरू केली असली तरीही, महायुती वा महाविकास आघाडीमध्ये अद्यापही शांतता आहे. शहरात शिवसेना (शिंदे गट), काँग्रेस, शिवसेना (उबाठा), भाजप यांची ताकद आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी, महायुती निश्चित होणार असल्याचे सांगितले जात आहे; मात्र स्थानिक पातळीवर मित्रपक्षांच्या बैठकाच झालेल्या नाहीत. २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत राजापूरमध्ये काँग्रेसचे सात, शिवसेना आठ आणि राष्ट्रवादी-भाजपचा प्रत्येकी एक नगरसेवक होता. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला भाजपच्या नगरसेवकाची साथ राहिल्याने पालिकेमध्ये आघाडीचे वर्चस्व होते. पुढील पाच वर्षामध्ये फारशा राजकीय घडामोडी घडलेल्या नाहीत.
राज्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पक्षांतर्गत घडामोडीचे पडसाद राजापूरच्या राजकारणात उमटले आहेत. राजकीय स्थित्यंतरे झालेली आहेत. नवी प्रभागरचना आणि वाढलेली नगरसेवक संख्या यामुळे प्रभागातील राजकीय समीकरणेही बदलणार आहेत. या साऱ्यांमध्ये उमेदवारी निश्चितीसह बहुमताच्या विजयाचे समीकरण जुळवणे राजकीय पक्षांसमोर आव्हान आहे.
----
चौकट १
२०१६ ची प्रभागरचना
प्रभाग* ८
नगरसेवक* १७
स्वीकृत* २
चौकट २
२०२५ ची प्रभागरचना
प्रभाग* १०
नगरसेवक* २०