हातखंबा तिठ्यावर हायमास्ट बंद
परिसरात काळोखाचे साम्राज्य ; प्रवाशांना त्रास
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या हातखंबा तिठ्यावर बसवण्यात आलेले नवे हायमास्ट दिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे रात्री या परिसरात काळोख असतो. त्याचा फटका येथील स्थानिक प्रवाशांना बसत आहे.
हातखंबा तिठा अत्यंत गर्दीचा असून, तीन प्रमुख रस्ते येथे एकमेकांना जोडतात. महामार्गाचे काम या भागात पूर्ण झाले असले तरीही हायमास्ट सुरू करण्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झालेले आहे. सुरुवातीला काही दिवस हे दिवे कार्यान्वित ठेवण्यात आले होते; मात्र त्यानंतर ते अचानक बंद झाले. हातखंबा परिसरात मागील काही दिवसांत तब्बल तीन चोरीच्या घटना घडल्या. यातील चोरटे अजूनही पसार आहेत. या परिस्थितीत चौकातील हायमास्ट बंद असल्यामुळे रात्री गुन्हेगारी कृत्यांना उत्तेजन मिळत आहे. या महत्त्वाच्या चौकातील हायमास्ट बंद असताना याकडे महामार्ग प्राधिकरण विभाग दुर्लक्ष का करत आहे? असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित विभागाने तातडीने या हायमास्ट दिव्यांची दुरुस्ती करून ते कार्यान्वित करावेत, अशी मागणी प्रवाशांकडून सुरू आहे.