rat६p२२.jpg-
२५O०२८३४
रत्नागिरी ः नाचणे येथे शिवशंभू मित्रमंडळातर्फे साकारण्यात आलेल्या विजयदुर्ग किल्ल्याच्या प्रतिकृतीवर ‘भव्य दीपोत्सव’ सोहळा.
---
त्रिपुरारी पौर्णिमेस छत्रपती नगरात दीपोत्सव
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ ः दीपावली सण संपल्यानंतर येणाऱ्या आणि विशेष धार्मिक महत्त्व असलेल्या कार्तिक पौर्णिमेच्या म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेला शहरातील छत्रपती नगर, साळवीस्टॉप येथे शिवशंभू मित्रमंडळाने आयोजित केलेला दीपोत्सव सोहळा उत्साहात झाला.
त्रिपुरारी पौर्णिमेचे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व भारतीय संस्कृती आणि परंपरेनुसार कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून साजरे केले जाते. याच दिवशी भगवान महादेवाने त्रिपुरासुराचा वध करून तिन्ही लोकांवर विजय मिळवला होता. हा विजयोत्सव म्हणून साजरा करण्याची आणि या दिवशी शिवमंदिरात दिवे लावून महादेवाची कृपादृष्टी प्राप्त करण्याची प्रथा पूर्वापार चालत आलेली आहे. हिंदुस्थानातील लाखो शिवमंदिरांमध्ये याच भावनेतून दीप प्रज्वलित केले जातात. याच परंपरेचा सन्मान राखत ज्या गडकिल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांचे पाऊल पडले आहे तेथे असलेले शिवमंदिर हे आपले प्रेरणास्थान आहे, ही उदात्त भावना मनात ठेवून शिवशंभू मित्रमंडळाने हा विशेष सोहळा आयोजित केला होता. प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दीपावलीनिमित्त ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्याची भव्य आणि हुबेहूब प्रतिकृती साकारली होती. या कलात्मक प्रतिकृतीवरच दीपोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या साकारलेल्या किल्ल्यावर पारंपरिक शिवमंदिराप्रमाणेच भाविकांनी मोठ्या संख्येने पणत्या आणि दिवे लावले. त्रिपुरारी पौर्णिमेच्या सायंकाळी शिवशंभू मित्रमंडळाच्यावतीने या विजयदुर्ग किल्ल्याच्या प्रतिकृतीवर ‘भव्य दीपोत्सव’ सोहळा झाला. या सोहळ्यात शेकडो दिव्यांची रोषणाई करण्यात आली.