जमीन वादातून वृद्धाला मारहाण
माखजन बाजारपेठेतील घटना; तिघांवर गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ६ ः संगमेश्वर तालुक्यातील कासे बडेवाडी येथे जमिनीच्या जुन्या वादातून ८० वर्षीय वृद्धाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. हा प्रकार माखजन बाजारपेठेत घडला असून, या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामचंद्र पांडुरंग गोताड (वय ८०, मूळ रा. कासे बडेवाडी, सध्या रा. दिवा, ठाणे) यांनी या संदर्भात पोलिसांत तक्रार दिली आहे. गोताड आणि संशयित हे एकमेकांचे शेजारी आहेत. त्यांच्यात पूर्वीपासून जमीनजागेवरून वाद आहेत. तक्रारदार रामचंद्र गोताड आणि संशयित उमेश भागाराम घाणेकर हे माखजन बाजारपेठेत असताना गोताड यांच्या मोबाइलमध्ये चुकून उमेश घाणेकर यांचा फोटो काढला गेला. या गोष्टीचा राग मनात धरून उमेश भागाराम घाणेकर याने वृद्ध गोताड यांना काठीने मारहाण केली. तसेच संशयित दिनेश भागाराम घाणेकर आणि सरिता घाणेकर यांनीही शिवीगाळ करत धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या घटनेत तक्रारदार रामचंद्र पांडुरंग गोताड हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.