खेडमध्ये ढगाळ वातावरण
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ६ : तालुक्यात गेल्या दहा दिवसांपासून परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली होती. आता दोन दिवसांपासून पावसाला विराम मिळाला असला तरीही तालुकाभर आकाशात ढगाळ वातावरण कायम आहे. त्यामुळे पुन्हा कधीही पाऊस कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही, हीच शेतकऱ्यांसाठी नवीन चिंता बनली आहे.
सध्या अनेक शेतकऱ्यांची भातपिके कापणीस तयार आहेत. काही ठिकाणी कापणी सुरू झाली असून, काही ठिकाणी भात वाळवण्याचे कामही सुरू आहे; मात्र वातावरणातील दमटपणा आणि ढगाळ हवामानामुळे वाळवण प्रक्रियेला अडथळा निर्माण होत आहे. जर पुन्हा पाऊस सुरू झाला तर आधीच कष्टाने उभे केलेले पीक पुन्हा एकदा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आता आणखी थोडा पाऊस झाला तर उरलेले भातपीकदेखील ओले होईल आणि उत्पादनावर मोठा परिणाम होईल. काही ठिकाणी शेतकरी पीक वाचवण्यासाठी घाईघाईने कापणी करून शेतातून भात बाहेर काढत आहेत तर काही ठिकाणी जमिनी ओल्या असल्याने यंत्रसामग्री वापरणे कठीण ठरत आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवल्याने शेतकऱ्यांच्या कपाळावर पुन्हा आट्या उमटल्या आहेत.