- rat६p२४.jpg-
२५O०२८६७
दापोली ः आंजर्ले समुद्रकिनारी पर्यटकांची गाडी बुडाली होती.
-----
पर्यटकांनी स्टंटबाजी नडली, चारचाकी समुद्रात बुडाली
आंजर्ले किनाऱ्यावरील घटना ; स्थानिकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. ६ ः तालुक्यातील आंजर्ले-सावणे किनाऱ्यावर पुणे येथील पर्यटकांनी मद्यधुंद अवस्थेत स्टंटबाजी करत मोटार थेट समुद्रात उतरवल्याचा प्रकार काल (ता. ५) घडला. पौर्णिमेमुळे समुद्राला उधाण असताना चारचाकी पुळणीत रूतली आणि पाण्यात बुडाली. आंजर्लेसह सर्व किनाऱ्यांवर वाहने चालवू नयेत, अशा सूचना देण्यात आल्या असूनही त्याकडे दुर्लक्ष करत काही पर्यटक बेफिकीरपणे वागतात. त्यामधून दुर्घटना घडत असून, त्याला आळा घालण्यात पोलिस प्रशासनाला अपयश येत आहे.
आंजर्ले किनारी वाळूत वाहने चालवू नका, अशा सूचना ग्रामस्थांकडून वारंवार पर्यटकांना दिल्या जातात; मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते. कालही ग्रामस्थांनी संबंधित चालकाला वाहन चालवण्यास मज्जाव केला होता; परंतु त्या पर्यटकांने गाडी बुडली तरी चालेल, आम्हाला कोणाची मदत नको असे उर्मटपणे सांगितले. त्यामुळे ग्रामस्थही मागे हटले. काहीवेळातच मोटार पूर्णपणे बुडताना दिसताच स्थानिक ८ ते १० तरुणांनी जिवाची पर्वा न करता धाव घेतली. त्यांनी दोरखंडांचा वापर करून मोटार बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गाडी किनाऱ्यावर आणण्यात यश मिळवले.
बीचवर चारचाकी नेण्यास बंदीचे फलक ठिकठिकाणी आहेत. तरीही काही पर्यटक बोलणे हिणवतात. आम्ही जीव धोक्यात घालून त्यांची गाडी बाहेर काढतो आणि शिवाय अरेरावी सहन करावी लागते. पर्यटन आम्हाला हवंयच; पण पर्यटकांनी नियम पाळले पाहिजेत. पोलिस प्रशासनाने कडक दंड आणि तातडीने गस्ती वाढवावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ सिद्धेश देवकर यांनी सांगितले.