मोटार दुचाकीचा अपघात
भरणेतील घटना ; महामार्गावर वाहतूककोंडी
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ६ : मुंबई-गोवा महामार्गावरील भरणेनाका येथील श्री काळकाई एंटरप्राईजेस समोर चारचाकी आणि दुचाकीच्या अपघातात मोटार सायकलस्वार जखमी झाल्याची घटना गुरूवारी (ता. ६) दुपारी घडली.
मुंबईहून खेडकडे येणारी मोटार आणि त्याच दिशेने जाणारी दुचाकी यांचा अपघात झाला. यामध्ये मोटरसायकलस्वार रस्त्यावर दूर फेकला गेला. त्यात तो जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच भरणेनाका येथील पुलाजवळ सतत अपघातग्रस्तांच्या मदतीस तत्पर असलेली श्री जगद्गुरू नरेंद्राचार्य संस्थान नाणिजधाम यांची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमीला प्राथमिक उपचार देत उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे हलविण्यात आले. या अपघातात जखमी झालेल्या शंकर भीमराव भोसले (वय ४०, रा. तिसंगी) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी असल्याने काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला होता. या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात अद्यापही कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.