कोकण

थकलेला बळीराजा !

CD

बोल बळीराजाचे ------लोगो
(१ नोव्हेंबर टुडे ३)

इतिहासात कधीही न अनुभवलेला पावसाळा यावर्षी कोकणातील माझ्या बळीराजाने अनुभवला; पण न भुतो न भविष्यति! असं म्हणायच काही धाडस होत नाही. वर्षागणिक पावसाळा सहा महिन्यांचा झालायं. माझ्या बळीराजाचं मात्र कंबरडं मोडलंय. एकतर शेवटच्या टप्प्यातला आंबा धुवून गेला आणि आता भात, नाचणीला जाग्यावरच मोड आलेत. पुढच्या आंबा हंगामाचा अंदाज आता परमेश्वरही सांगू शकत नाही, अशी परिस्थिती बळीराजा अनुभवतोय. कधीही न रडणारा, कायम लढणारा, हताश न होणारा बळीराजा एकामागोमाग एक येणाऱ्या अस्मानी सुलतानी प्रसंगांच्या लाटांनी आता थकत चालला आहे. अशा माणसाला जीवंत ठेवते हे खरं...पण आता आशातरी कोणाकडून करणार?

- rat७p२१.jpg-
P२५O०२९८६
- जयंत फडके,
जांभूळआड-पूर्णगड, रत्नागिरी
---------
थकलेला बळीराजा!

भात कोकणातलं मुख्य पीक आणि मुख्य आहार. इथं गरीब-श्रीमंत, उच्च-नीच हा भेद बिल्कुल नाही. सकाळच्या न्याहारीच्या लाल तांदळाच्या पातळ भातखिमटीपासून रात्रीच्या गरम मसाला आमटीभातापर्यंत भाताच्या घासाशिवाय जेवण पूर्णच होत नाही इथं. अगदी मासळी-मटणाबरोबरही भात असतोच. आंबा, काजूचं किती कौतुक झालं तरीही मुख्य अन्न भातच! त्या भातशेतीचेच पावसाने दिवाळीनंतर दिवाळं वाजवलं. सलग पाऊस, वेळेआधीच पेरे, न वाळलेला चिखल यांनी गणपती-नवरात्रापर्यंत पिकणारं सोनं नंतर मृगजळात कधी बदललं ते कमी-जास्त दाबाच्या पट्ट्यात बदलण्यावाचून काही हातात राहिलं नाही. हा दाब माझ्या बळीराजावर असा काही पडलाय की, त्यातून तो कधी वर येईल हे सांगताही येत नाही. चक्रीवादळात तो पुरता चक्रावलाय..‘मागच्या वर्षी बरं होतं,’ असं तो आता चेष्टेतही म्हणणार नाही. भाताबरोबर नाचणी, वरी, कुळीथ, उडीद अशी सगळीच पावसाळी पिकं साफ धुवून निघालीत. भाताचा पेंढा तर इतके दिवस पाण्यात फुगलाय की, त्याला जनावरही तोंड लावणार नाहीत. आलेच आंबे तर पेटीला हा काळा पडलेला धापट पेंढा वापरण्याशिवाय त्याच्याजवळ दुसरा पर्याय नाही. भात गेले पंधरा दिवस पावसात फुगतंय. त्याला जाग्यावरच मोड आलेत. काहीतरी मिळेल, या वेड्या आशेनं तो जमेल तसं कापून झोडतोय; पण फुगलेल्या भातगोट्याला आता आठ दिवसांनी पिशवीतच मोड आलेत. पसरून ठेवावं इतकी घरं मोठी नाहीत. चकचकीत लाद्यांनी आता बळीराजाला गुळगळीत केलंय. पंख्याखाली भात वाळता वाळत नाही. नाचण्याच्या कणसांचा हातातच चुरा होतोय. कुळीथ, उडीद तर काढायलाच नकोयत. सगळीकडून कावलेला बळीराजा टीव्हीवरच्या बातम्या बघून अवाक् होतोय. तिथल्या लोकप्रतिनिधींकडून चार दिवसाच्या पुराचं केवढं आकांडतांडव झालं. बळीराजा कुठलाही असला तरी नुकसान हे नुकसानच; पण कोकणात गेले वीस-पंचवीस दिवस पाऊस धुमाकूळ घालतोय; पण एकही लोकप्रतिनिधी बांधावर फिरकलेला नाही. तिथे आठ दिवसात कोट्यांनी रुपयांची मदत जाहीर तरी झाली इथे अजून पंचनाम्याचा पत्ता नाही. एक कृषी सहाय्यक वीस गावात पंचनाम्यांसाठी फिरतोय. तो पोहचेपर्यंत आता अडव्यांतून (उडव्यांतून) कुजकट, कुबट वास यायला लागेल धापट पेंढ्याचा. त्या पंचनाम्यात किती नुकसान आणि किती भरपाई मिळणार, ते आई नवलाई-पावणाई-रवळनाथच जाणे.; पण त्याचं ना कोणाला सूतक ना सोयर.
हवामान अंदाज हा अनेक वर्षे चेष्टेचा विषय होता; पण गेले काही वर्षे तत्कालिक हवामान अंदाज बऱ्याचअंशी बरोबर येत आहेत; पण दूरगामी, चार-पाच महिन्याचे ढोबळ अंदाजही शेतकऱ्यांसाठी आवश्यक आहेत. यावर्षी जर पाऊस इतका लांबणार आहे, हे आधीच लक्षात आले असते तर महान, जास्त दिवसाचे भातबियाणे निवडता आले असते. भारतीय पंचांग, फलज्योतिष आणि भविष्य कथनाच्या अनेक शाखा आपले महत्त्व टिकवून आहेत. आता आम्ही आधीच छातीठोकपणे सांगितले होते, असे म्हणणे सोपे आहे; पण हवामान विभाग आणि ज्योतिष शास्त्र यांच्या ताळमेळातून काही मार्गदर्शन माझ्या बळीराजाला मिळाले तर ते नक्कीच दूरगामी फायद्याचे होऊ शकेल.
भाताचं बियाणं यावर्षी मोठ्या चिंतेचा विषय झालाय. माझा बळीराजा काही प्रमाणात तरी स्वतःचं पिढीजात जपलेलं बियाणंच वापरतो. मधल्या काळात संकरित भातबियाण्यांचा असा काही भूलभुलैयात तयार झाला की, आईपेक्षा मावशीच सुंदर-गोरी वाटायला लागली; पण दरवर्षी नवीन गोरी मावशी परवडणारी नाही, हे माझ्या बळीराजाच्या वेळेवर लक्षात आलं. यंदा तर दुपारी भाताचं फूल फुलताना पाऊस सलग पडला आणि भात लोंबी छान दिसली तरी दाण्यात दुधच भरलं नाही. विकतच्या बियाण्यांचे तुरे तर अप्सरा आली म्हणता म्हणता कधी त्राटिका-हिडिंबाच्या भूमिकेत गेले ते कळलंच नाही. भाताची लोंबी फोटोत छान; पण वारवताना मळणीवर दाणा शिल्लक राहील तर शपथ, अशी वेळ आली. पुन्हा एकदा आपल्या स्वतःच्या बियाण्याचं महत्त्व अधोरेखित झालं. आता तेवढं जरी यावर्षी सांभाळता आलं तरी मिळवलं. शेतीत आणि मुंबईत कोणी उपाशी मरत नाही हे खरं; पण मुंबई ही एकदा बुडाली होती. आता माझ्या बळीराजाच्या पाठीशी फक्त शासन, प्रशासनानंच नव्हे तर समाजानंही उभं राह्यला हवं. रक्त आणि अन्न मशिनवर तयार होत नाही. अगदी कोरोनातही शेती ठप्प झाली नाही. अर्थव्यवस्था उभी आहे ती शेतीक्षेत्रावरच; पण ‘रोज मरे त्याला कोण रडेल?’


(लेखक प्रगतीशील आणि प्रयोगशील शेतकरी आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Conflict: पाकिस्तान खरंच अणुचाचण्या करतंय का? संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मांडली भारताची भूमिका

Pune Traffic : सिंहगड रस्त्यावरील उड्डाण पुलावर रिक्षा-कारचा तिहेरी अपघात! मोठी वाहतूक कोंडी, नागरिक हैराण

Pune News : जेवणात झुरळ, पिन! COEP च्या मुलींच्या वसतिगृहात मनविसेचे तीव्र आंदोलन; विद्यापीठाला ७२ तासांचे अल्टिमेटम

Latest Marathi News Live Update: जिल्हा परिषद निवडणुकांची लवकरच घोषणा!

Railway Ticket Booking : रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंग सिस्टीममध्ये केला मोठा बदल!

SCROLL FOR NEXT