rat१८p६.jpg-
२५O०५०९८
कुर्धे : पावसाने वाहून गेलेला बंधारा परत बांधून त्यासोबत अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी.
---
वाहून गेलेला बंधारा पुन्हा उभा
कुर्धेत एनएसएसचे शिबिर ; विद्यार्थ्यांचे श्रमदान
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ : पावसात बंधारा वाहून गेला तरीही एनएसएसच्या स्वयंसेवकांनी हार मानली नाही. तो बंधारा पुन्हा बांधला आणि त्यात भरपूर प्रमाणात पाणी साठले आहे. ही प्रेरक गोष्ट आहे अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाची.
अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिर कुर्धे येथे झाले. त्या वेळी नदीवर ८० विद्यार्थ्यांनी ४० फुटी बंधारा बांधला. शिबिरानंतर पडलेल्या अतिवृष्टीमुळे व लांबलेल्या पावसामुळे हा बंधारा वाहून गेला; पण विद्यार्थ्यांनी हा बंधारा पुन्हा बांधण्याकरिता एक दिवस श्रमदान केले आणि ४० फुटी बंधारा परत बांधला.
गावातील पाणीसाठा बराच काळ टिकावा, पाणीसाठ्यामध्ये वाढ व्हावी याकरिता आणि विद्यार्थ्यांना श्रमदानाचे महत्त्व समजावे आणि योग्य संस्कार व्हावेत, हा त्या पाठीमागचा उद्देश होता. बंधाऱ्याला माजी स्वयंसेवकांचेदेखील योगदान आहे. वरिष्ठ महाविद्यालयातील कार्यक्रमाधिकारी सचिन सनगरे आणि त्यांचे स्वयंसेवक, कनिष्ठ महाविद्यालयातील माजी कार्यक्रमाधिकारी निनाद तेंडुलकर आणि प्रभात कोकजे उपस्थित होते. गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या कामाचे कौतुक केले. या बंधाऱ्यामुळे गावातील विहिरींच्या पाणीसाठा नक्कीच वाढणार आहे, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य गोसावी, पर्यवेक्षक केळकर यांचे मार्गदर्शन मिळाले.