बाराही वाड्यांमधील सदस्य घ्यावेत
धर्मादाय आयुक्त ः उंबर्डे मंदिर न्यासाबाबत निर्णय
वैभववाडी, ता. २२ ः उंबर्डे महालक्ष्मी मंदिर न्यासामध्ये गावातील बारा वाड्यांतील एक याप्रमाणे बारा सदस्यांचा समावेश करावा, असा निर्णय सहाय्यक धर्मादाय आयुक्त कोल्हापूर यांनी दिल्याची माहिती परशुराम शिरसाट यांच्यासह ग्रामस्थांनी येथे दिली.
उंबर्डे येथील महालक्ष्मी मंदिर न्यासाविषयी माहिती देण्यासाठी श्री. शिरसाट यांनी पत्रकारांशी येथे संवाद साधला. यावेळी सूर्यकांत मुद्रस, संतोष नारकर, चंद्रकांत तावडे, प्रभाकर पावसकर, विजय पांचाळ, विनोद पांचाळ, किशोर दळवी, वसंत सोनाळकर, गणेश पाटणकर उपस्थित होते.
त्यांनी सांगितले की, ‘उंबर्डे महालक्ष्मी मंदिर हे ग्रामदैवत आहे. साडेतीनशे वर्षांपासून या मंदिरात सर्व उत्सव गुण्यागोविंदाने साजरे होतात. गावाची लोकसंख्या ४ हजार ५०० असून गावात बारा वाड्या आहेत. असे असताना महालक्ष्मी मंदिर न्यास तयार करताना केवळ ४९ ग्रामस्थांच्या उपस्थितीत केला. न्यासामध्ये अध्यक्ष, सचिव आणि खजिनदार हे तीन पदाधिकारी वंशपरंपरेने कायम राहतील, अशी घटनेत तरतूद आहे. यासंदर्भात श्री. शिरसाट आणि ग्रामस्थांनी सहाय्यक धर्मादाय आयुक्त कोल्हापूर यांच्याकडे अर्ज दाखल केला होता. मंदिर संपूर्ण गावाचे असल्याने बारा वाड्यांतील प्रत्येकी एक सदस्य या न्यासामध्ये करण्याची मागणी त्यांनी केली होती. यासंदर्भात १७ ऑक्टोबरला सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी स्थापन केलेल्या न्यासामध्ये १२ वाड्यांतील प्रतिनिधींचा समावेश करण्याचा आदेश दिला असल्याचे शिरसाट व मुद्रस यांनी स्पष्ट केले. गावातील सर्व लोकांना विश्वासात न घेतल्यामुळे आम्हाला सहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडे जावे लागले, असे त्यांनी सांगितले.
.........................
कोट
गावसभेत सर्वसंमतीने न्यास स्थापन केला होता. तरीही न्यायालयाने जो निर्णय दिला आहे, त्या निर्णयाला आम्ही बांधील राहुन कार्यवाही करू.
- विजय दळवी, अध्यक्ष, महालक्ष्मी मंदिर न्यास, उंबर्डे