rat23p13.jpg-
06162
मंडणगड ः पणदेरी धरणाचे कामाचे नामफलक अनावरण करताना गृहराज्यमंत्री योगेश कदम व उपस्थित मान्यवर.
पणदेरी धरणाचे काम राज्यासाठी आदर्श ठरेल
योगेश कदम ; ६३ कोटींच्या पुनर्बांधणी कामाला सुरवात
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २३ः अतिवृष्टीत गळती लागल्यामुळे दुरुस्तीसाठी आवश्यक झालेल्या पणदेरी धरणाच्या गुणवत्तापूर्ण पुनर्बांधणीचे काम संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श ठरेल, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पणदेरी येथे केले.
जलसंपदा विभागामार्फत मंडणगड तालुक्यातील पणदेरी लघु पाटबंधारे योजनेंतर्गत धरणाचे मजबुतीकरण, सांडवा दुरुस्ती आणि मुख्य विमोचकाच्या बांधकामासाठी मंजूर करण्यात आलेल्या ६३ कोटी रुपयांच्या निधीच्या कामाच्या भूमिपुजन प्रसंगी ते बोलत होते. मंत्री कदम म्हणाले, २०२१ मध्ये गळती लागलेल्या धरणाचे काम दीर्घकाळ टिकावे, ही पंचक्रोशीची मागणी होती. शासनाकडून मिळालेल्या निधीमुळे केवळ दुरुस्ती नव्हे, तर धरणाची जणू नव्याने उभारणी केली जात आहे. जलसंपदा विभागाने उत्तम नियोजन करून केलेल्या या कामाचा लाभ पंचक्रोशीसह आजूबाजूच्या गावांना मोठ्या प्रमाणात होणार असून पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीला यामुळे मोठा हातभार लागेल. धरणाशी संलग्न बंदिस्त कालव्यांसाठी शंभर टक्के निधी उभारून पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचवू, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला शिवसेना तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर, महिला विधानसभा समन्वयक अस्मिता केंद्रे, रामदास रेवाळे, तालुका संघटक अनंत लाखण, विभाग प्रमुख आनंद भाटे, इरफान बुरोंडकर, दीपक मालुसरे, संजय शेडगे, अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, कार्यकारी अभियंता श्री. सलगर उपस्थित होते.