रेडी स्वयंभू मंदिरात
शहिदांना आदरांजली
सावंतवाडी ः रेडी स्वयंभू देवी माऊलीच्या वार्षिक जत्रोत्सवाचे औचित्य साधून नुकताच सायंकाळी श्री सप्तेश्वर (स्वयंभू) महादेव मंदिर, रेडी येथे ‘एक दीप भारतमातेच्या वीरगती प्राप्त जवाना’साठी आदरांजली अंतर्गत ‘दीपोत्सव’ हा कार्यक्रम झाला. यावेळी १,१११ दीप प्रज्वलित करून शहिदांना आदरांजली वाहण्यात आली. (कै.) राजन बापू रेडकर मित्रपरिवार आयोजित अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ, युवा भंडारी मित्रपरिवार, माऊली डी. जे. अँड डेकोरेटर्स यांच्या सहकार्याने आयोजन करण्यात आलेल्या दीपोत्सवाचे यंदाचे नववे वर्ष होते. या कार्यक्रमास राजन बापू रेडकर यांच्या सिंधुदुर्ग जिल्हयातील मित्रपरिवाराच्या उपस्थितीत सप्तेश्वर (स्वयंभू) महादेव मंदिरात १,१११ दीप प्रज्वलित करण्यात आले. श्रींचरणी पुरोहित प्रसाद अभ्यंकर यांनी दीप-पुष्प अर्पून पूजन केले. आयोजनासाठी हॉटेल पारिजात-रेडी, नीलेश राणे, दिलीप साळगावकर, विनायक कांबळी, रेडी तंटामुक्ती अध्यक्ष वैभव आसोलकर, रिमा मेखी, भूमी मांजरेकर, रवींद्र राणे, महेंद्र गवंडी यांचे विशेष सहकार्य लाभले.
....................
बंधारा बांधकामाचा
गोळवण येथे प्रारंभ
मसुरे ः ग्रामपंचायत गोळवण-कुमामे-डिकवलच्या आदर्श गाव संकल्प व प्रकल्प योजनेअंतर्गत गोळवण येथे सिमेंट नाला बांध बांधणे या कामाचा प्रारंभ कणकवलीचे उपविभागीय कृषी अधिकारी उमाकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. गोळवण गावातील देवराई रोणाचा बांध येथे हा बंधारा बांधला. मालवण तालुका कृषी अधिकारी अमोल करंदीकर, पोईप मंडळ कृषी अधिकारी डी. के. सावंत, रामेश्वर युवा कृषी मंडळ अध्यक्ष मंगेश सावंत, कृषी सहायक नीतेश पाताडे, सरपंच सुभाष लाड, उपसरपंच शरद मांजरेकर, तांत्रिक कार्यकर्ता संदेश पवार, रामकृष्ण नाईक, नंदू नाईक, रमेश परब, दिवाकर परुळेकर, कोमल मांजरेकर, समिता गावडे आदी उपस्थित होते.
----
नावळे भगवतीचा
बुधवारी जत्रोत्सव
वैभववाडी ः नावळे ग्रामदैवत श्री भगवती देवीचा वार्षिक जत्रोत्सव बुधवारी (ता. २६) साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी श्री भगवती देवीची पारंपरिक पद्धतीने पूजा करून दुपारी पालखी, देवीचे निशाण तरंग सजवून ढोल-ताशांच्या गजरात लवाजम्यासह पालखी ब्राह्मणदेव मंदिरात जाणार आहे. तेथे ब्राह्मण देवाला भेटीचा नारळ ठेवल्यानंतर रात्री पालखी भगवती मंदिराकडे वाजत-गाजत येणार आहे. भगवती मंदिराला पाच प्रदक्षिणा घेऊन पालखी मंदिरात जाऊन मग ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात होते. रात्री ‘डान्स तारका सुंदर’ फेम सेलिब्रिटी नृत्यांगना दीक्षा नाईकसोबत १४ तारकांचा नृत्य कार्यक्रम होणार आहे. उपस्थित राहावे, असे आवाहन देवस्थान मंडळ व नावळेवासीयांनी केले आहे.
........................
मसुरे येथे आज
पुण्यतिथी उत्सव
मसुरे ः मसुरे देऊळवाडा येथील श्री स्वामी मंगल महाराज पुण्यतिथी उत्सव उद्या (ता. २४) साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी नऊला श्रींच्या समाधीवर अभिषेक व पूजाअर्चा, दहाला महाआरती, दुपारी एकला महाप्रसाद, सायंकाळी पाचला सत्यनारायण महापूजा, रात्री आठला भजने, दहाला दत्तमाऊली दशावतार नाट्यमंडळाचा ‘वस्त्रात अडकले ब्राह्मरेत जन्मास आले शिवतेज’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. या कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन मंडळाने केले आहे.
---
खाजने माऊली
जत्रोत्सव गुरुवारी
सावंतवाडी ः गोवा-पेडणे तालुक्यातील खाजने येथील श्री माऊली देवीचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवारी (ता. २७) होणार आहे. यानिमित्त सकाळी देवीची पूजा, अभिषेक व विविध धार्मिक विधी, ओट्या भरणे, भाविकांची गाऱ्हाणी होणार आहेत. रात्री ११ वाजता पालखी प्रदक्षिणा व त्यानंतर वालावलकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन देवी माऊली देवस्थान समितीने केले आहे.