09467
गिर्ये : येथे डी. के. पडेलकर यांनी मार्गदर्शन केले.
संविधानाचा उद्देश पोहोचवणे आवश्यक
डी. के. पडेलकर : आंबेडकरांच्या अस्थिकलशाचे दर्शन
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ९ : भारतीय संविधान देशातील शेवटच्या माणसाचे प्रतिनिधित्व करते. त्यामुळे संविधानाचा उद्देश नागरिकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक असल्याचे मत आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक डी. के. पडेलकर यांनी तालुक्यातील गिर्ये येथे व्यक्त केले. दरम्यान, गिर्ये येथील बुद्ध विहारात ठेवण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे अनेकांनी दर्शन घेतले.
तालुक्यातील गिर्ये बुद्ध विहारात तालुका बौद्धजन सेवा संघ, तसेच गिर्ये बौद्धजन विकास मंडळ मुंबई-ग्रामीण आणि पंचशील महिला मंडळ गिर्ये यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. पडेलकर बोलत होते. मंचावर उत्तम कांबळे, अनिल पुरळकर, किशोर कांबळे, संजय कांबळे, सुनील कांबळे, संतोष गिरकर, दिलीप गिरकर, सिद्धार्थ गिरकर, लता गिरकर, सुनील गिरकर, चंद्रकांत गिरकर, सचिन गिरकर आदी उपस्थित होते.
श्री. पडेलकर म्हणाले, ‘‘केवळ जयजयकार करून न थांबता डॉ. आंबेडकर यांचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण करण्यासाठी उभारलेली चळवळ पुढे नेण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. यासाठीच भारतीय संविधानाचा जागर आवश्यक आहे. गिर्ये बुद्ध विहार येथे जतन करून ठेवण्यात आलेला बाबासाहेबांचा अस्थिकलश असीम श्रद्धा आणि विलक्षण आस्थेचा विषय असून प्रेरणा, ऊर्जास्रोत आहे. याचे पावित्र्य सर्वांनी जपले पाहिजे. या माध्यमातून समाजमनाला विधायक सवयींकडे वळवले पाहिजे.’’
अभिवादन सभेसाठी बौद्धजन सेवा संघाच्या गाव शाखांनी डॉ. आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले. मान्यवरांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला तसेच भारतीय संविधानाच्या प्रतीला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी सेवा संघाच्या महिला बौद्धाचार्य अर्पिता साळुंखे, संजीवनी गिरकर यांनी बुद्धवंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. सचिन गिरकर यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. यावेळी विजयदुर्ग ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संजय कातिवले, विजय कोंडकर, अनिल पुरळकर, संजीवनी गिरकर, उदय पेंढारकर, जयवंत वाडेकर, सुरेश साळुंखे, लता गिरकर आदींनी मनोगत व्यक्त केले. महिला अध्यक्षा अर्पिता साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. सचिव मनोहर सावंत यांनी सूत्रसंचालन केले. सचिन गिरकर यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.