- rat२p१.jpg-
P२६O१५०५५
लांजा ः नगराध्यक्ष सावली ग्रुप यांचे अभिनंदन करताना उद्योजक अण्णा सामंत.
मतभेद विसरून विकासासाठी एकत्र या
नगराध्यक्षा कुरूप ः सर्वपक्षीय नगरसेवकांना साद
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. २ ः नव्याने निवडून आलेल्या सर्व नगरसेवक-नगरसेविकांनी आपापसामध्ये कोणतेही मतभेद न ठेवता लांजा शहराच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न एकत्रितपणे साकार करूया, असे प्रतिपादन नगराध्यक्षा सावली कुरूप यांनी लांजा येथे पदग्रहण सोहळ्यावेळी केले.
लांजा नगरपंचायतीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदी निवडून आलेल्या महायुतीच्या कुरूप यांचा पदग्रहण सोहळा काल (ता. १) सकाळी झाला. या वेळी त्यांनी सर्वपक्षीय नगरसेवकांना आवाहन केले. या वेळी उद्योजक अण्णा सामंत, महायुतीचे प्रचारप्रमुख प्रसन्न शेट्ये, शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके, महंम्मद रखांगी, मुख्याधिकारी अभिजित कुंभार, तहसीलदार प्रियांका ढोले, उद्योजक विकास शेट्ये, कमलाकर गांधी, नाना शेट्ये, विठोबा लांजेकर आदींसह सर्व नगरसेवक उपस्थित होते. या प्रसंगी कुरूप म्हणाल्या, आमदार किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली लांजा शहरातील असलेल्या विविध समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. निवडणूक प्रचारावेळी लांजावासियांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहील.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला नवनिर्वाचित नगराध्यक्ष कुरूप तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले उद्योजक अण्णा सामंत तसेच सर्व नगरसेवकांचाही सत्कार करण्यात आला. माजी नगरसेवक सचिन डोंगरकर यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला लांज्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, व्यापारी, महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, लांज्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
------
नगरसेवकांमधील पक्षीय बलाबल
शिवसेना (शिंदे गट)* ९
भाजप* १
ठाकरे* १
अपक्ष* ६