swt1419.jpg
17780
सावंतवाडी ः कचराकुंड्यांमधील कचरा फुटपाथवर असा इतस्ततः पसरला आहे.
सावंतवाडीत मोठ्या कचराकुंड्या बसवा
सायली दुभाषी ः नगरपालिका प्रशासनाकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १५ ः शहरातील मोती तलावाकाठी नगरपरिषदेमार्फत उभारण्यात आलेल्या छोट्या कचराकुंड्यांतील कचरा फूटपाथवर पसरत असल्याने सकाळच्या वेळी मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांना अस्वच्छतेचा आणि दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. या प्रकाराबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून प्रशासनाने यावर तत्काळ उपाय योजना म्हणून मोठ्या कचराकुंड्याचा वापर करावा, अशी मागणी नगरसेविका सायली दुभाषी यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.
दुभाषी यांनी फुटपाथवरील कचराकुंड्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पालिका प्रशासनाने मोती तलावाच्या फुटपाथवर छोट्या कचराकुंड्या उभारल्या आहेत. तलावाकाठी हॉटेल व्यवसायिक तसेच आईस्क्रीम पार्लर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. या ठिकाणी येणारे पर्यटक आपला कचरा या कचराकुंड्यांमध्ये टाकतात; परंतु या कुंड्या छोट्या असल्याने त्यातील कचरा मोकाट कुत्रे तसेच जनावरे बाहेर काढतात. हा कचरा फुटपाथवर तसेच बाजूच्या रस्त्यावर पसरत असल्याने सकाळच्या वेळी मॉर्निंग वॉकला फिरणाऱ्या ज्येष्ठ नागरिक तसेच अन्य नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. तसेच यामुळे परिसरात दुर्गंधी व अस्वच्छता निर्माण झाली आहे. एकीकडे स्वच्छतेच्या बाबतीत प्रशासन कटिबद्ध असताना कचराकुंड्यांमुळे निर्माण होणाऱ्या अस्वच्छतेकडे मात्र पूर्णतः दुर्लक्ष होत असून प्रशासनाने याकडे तत्काळ लक्ष द्यावा. छोट्या कचराकुंड्यांच्या जागी मोठ्या कुंड्या बसवल्यास त्यातील कचरा मोकाट जनावरे बाहेर काढणार नाहीत. त्यामुळे अस्वच्छतेचा प्रश्न उद्भवणार नाही. प्रशासनाने या मागणीचा विचार करावा. हा मुद्दा आपण प्रशासनाकडे लावून धरणार असून स्वच्छ सावंतवाडीसाठी आपला नेहमीच पुढाकार राहणार आहे, असे दुभाषी यांनी सांगितले.