- rat१५p२१.jpg, rat१५p२२.jpg-
P२६O१७९३८
पावस ः तालुक्यातील गणेशगुळे परिसरामध्ये काजूपीकाला पोषक वातावरण तयार झाल्यामुळे मोहोर चांगल्याप्रकारे तयार होत आहे.
- rat१५p२३.jpg-
२६O१७९४०
काजू झाडाला लागलेली बी.
(छायाचित्र ः मकरंद पटवर्धन गणेशगुळे)
------
पावसमध्ये थंडीच्या कडाक्याने काजू बागा बहरल्या
फेब्रुवारीपासून हंगामाची चाहूल ; पोषक वातावरण, उत्पादनात वाढ होण्याची शक्यता
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १५ ः यावर्षी लांबलेल्या पावसामुळे चिंतेत असलेल्या काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुखावह बातमी आहे. गेल्या महिन्याभरापासून थंडीत सातत्य राहिल्याने काजूपिकासाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून, पावस परिसरातील बागांमध्ये मोठ्या प्रमाणात मोहोर दिसून येत आहे. पोषक हवामानाचा हाच कल कायम राहिल्यास फेब्रुवारी महिन्यापासून काजूचा हंगाम प्रत्यक्ष सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यावर्षी पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक राहिल्याने सुरुवातीला शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. अतिवृष्टीचा फटका भातशेतीला बसला होताच; पण त्याचा परिणाम आगामी आंबा आणि काजू हंगामावरही होईल, अशी शक्यता निर्माण झाली होती; मात्र, पावसाने अचानक विश्रांती घेतल्यामुळे आणि त्यानंतर थंडीचा कडाका वाढल्याने काजूपिकाला जीवदान मिळाले आहे. सध्या पावस आणि परिसरातील बागांमध्ये काजूला चांगल्याप्रकारे मोहोर आला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादळीवाऱ्यामुळे काही प्रमाणात मोहोर गळती होत आहे. ही गळती नैसर्गिक असली तरी उर्वरित मोहोराची स्थिती उत्तम असल्याने उत्पादनात वाढ होण्याची आशा शेतकरी व्यक्त करत आहेत. गेल्या महिन्याभरातील थंडीमुळे काजूला मोहोर येण्यास पोषक वातावरण मिळाले आहे. जर हवामान असेच स्थिर राहिले तर फेब्रुवारीत काजू बी तयार होऊन हंगाम जोमाने सुरू होईल.
दरम्यान, गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा थंडीचा प्रभाव समाधानकारक असल्याने काजूपिकाचे उत्पन्न वाढण्याची चिन्हे आहेत. वातावरणातील बदलांचा मोठा फटका न बसल्यास यंदा कोकणी काजू बाजारात लवकर आणि मोठ्या प्रमाणात दाखल होऊ शकतो.
-----
कोट
गणेशगुळे परिसरामध्ये काजूपिकाला पोषक वातावरण असल्यामुळे यावर्षी चांगले पीक येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
- बंडा पटवर्धन, काजू बागायतदार