21346
सवंगडी रमले आठवणींच्या हिंदोळ्यावर
मालवणातील स्नेहमेळा; केळकर महाविद्यालयाची १९८९-९० ची बॅच
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १ ः येथील स. ह. केळकर महाविद्यालयाच्या १९८९-९० पदवी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा कोळंब (ता. मालवण) येथील सभागृहात उत्साहात झाला. कोरोनानंतर माजी विद्यार्थी प्रथमच एकत्रित झाल्याने आठवणींना उजाळा मिळाला. अनेक माजी विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले.
महाविद्यालयाच्या १९८९-९० बॅचच्या माजी विद्यार्थ्यांना पदवी प्राप्त होऊन सुमारे २५ वर्षे उलटल्याने कला आणि वाणिज्य शाखेच्या माजी विद्यार्थ्यांचा संयुक्त पहिला रौप्यमहोत्सवी पदवी वर्ष स्नेहमेळावा २१ मे २०१६ ला महाविद्यालयात झाला होता. त्यानंतर टप्प्याटप्प्याने मुंबई, कोल्हापूर, पुणे येथे मेळावे झाले. आता कोरोनानंतर अनेक वर्षे उलटल्याने कोळंब (ता. मालवण) येथे स्नेहमेळावा घेण्यात आला.
बॅचचे माजी विद्यार्थी आणि मालवणचे नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, प्रवीण सरवणकर यांनी यासाठीचे प्राथमिक नियोजन केले. त्याला येथील रमाकांत डगरे, द्विजकांत कोयंडे, जितेंद्र उपरकर, नाना जोईल, अभय कोयंडे, हेमंत पिसे आदींनी साथ दिली. मेळाव्यात जिल्हाभरासह मुंबई, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे येथील माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी गाणी, गप्पा, नृत्य यांसह मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले. अरुण घाडीगावकर, संतोष कुळकर्णी, प्रशांत मोंडे, तुकाराम धुरी, सीमा वझे-करंदीकर आदींनी मनोगत व्यक्त केले. ऋजुता कुबल आणि लता चोपडेकर यांनी एकेरी नृत्य सादर केले. तसेच मैत्रिणींचे एकत्रित नृत्य झाले. राजेंद्र सनये, सचिन खवळे, अविनाश फणसेकर आदींनी गिते सादर केली. त्याला कमलाकर पाटकर आणि सुरेश मेस्त्री यांनी संगीत साथ केली. संतोष पांचाळ आणि दिनेश राऊत यांनी गीतांमधून मनोरंजन केले. संगीता नेने हिने खेळ घेतले. यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. यानिमित्ताने मैत्रिणींचा हळदी-कुंकू समारंभ झाला. विद्याधर (नानू) राणे याने मित्रांचे एकत्रित छायाचित्र असलेला ‘मग’ सर्वांना भेट दिला. प्रकाश गोगटे यांनी ‘जनता जनार्दन’ हे पुस्तक सर्वांना भेट दिले. वर्षा भिडे-गाडगीळ, प्रकाश गोगटे यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.