रत्नागिरीत ‘वंदे मातरम् कोस्टल’चे आयोजन
सीआयएसएफचा पुढाकार; किनारपट्टीवरून ६,६०० किलोमीटरचा प्रवास
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ : केंद्रीय औद्योगिक सुरक्षादलाने (सीआयएसएफ) ५७ वर्षांच्या गौरवशाली सेवेचे औचित्य साधत १४ फेब्रुवारी रोजी रत्नागिरीतील पोलिस मैदानावर ‘वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉन २०२६’ या उपक्रमाचे आयोजन केले आहे. याचे उद्घाटन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. कोस्टल सायक्लोथॉनमध्ये देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरून ६ हजार ६०० किलोमीटरचा प्रवास करण्यात येणार आहे.
सागरी सुरक्षेबाबत जनजागृती, राष्ट्रीय एकात्मता, तंदुरूस्ती, पर्यावरण संवर्धन आणि महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे, हा सायक्लोथॉनचा उद्देश आहे. या मोहिमेत ५० टक्के महिला सहभागी होणार आहेत. या सायक्लोथॉनद्वारे किनारी भागातील नागरिकांमध्ये राष्ट्रीय सुरक्षेचे भान निर्माण करणे, नागरिक व ‘सीआयएसएफ’ यांच्यात समन्वय वाढवणे, तरुणपिढीला अमली पदार्थांच्या धोक्यांबाबत जागरूक करणे आणि बंदरसुरक्षेतील ‘सीआयएसएफ’च्या ५१ वर्षांच्या अनुभवाची माहिती देणे, हा उद्देश आहे. १९६९ मध्ये स्थापन झालेल्या ‘सीआयएसएफ’ने गेल्या ५७ वर्षांत रिफायनरिज, विमानतळ, बंदरे, मेट्रोरेल्वे, अणुऊर्जा प्रकल्प, अंतराळ केंद्रे यांसह देशाच्या अनेक सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या आस्थापनांची सुरक्षा सक्षमपणे सांभाळली आहे. सुरक्षेपुरतेच नव्हे तर जनजागृती, सामाजिक उपक्रम आणि सार्वजनिक सुरक्षिततेच्या कार्यक्रमांद्वारे सीआयएसएफ राष्ट्रीय सेवेची बांधिलकी जोपासत आहे.
‘वंदे मातरम्’ या देशभक्तिपर गीताच्या १५० वर्षांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या या कोस्टल सायक्लोथॉनमध्ये देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरून तब्बल ६ हजार ६०० किलोमीटरचा प्रवास करण्यात येणार असून, या उपक्रमाचा समारोप कोची येथे होणार आहे. मागील वर्षीच्या सायक्लोथॉन–२०२५ ला ३० लाखांहून अधिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.
----
चौकट
५२ किनारी गावे दत्तक
सामाजिक सहभागाच्या माध्यमातून ५२ किनारी गावांना तटप्रहरी म्हणून दत्तक घेण्यात आले आहे. त्या गावांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, नाट्यप्रयोग, वैद्यकीय सेवा, खुली व्यायामशाळा, क्रीडा सुविधा तसेच तस्करी व बेकायदेशीर घुसखोरी रोखण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. रत्नागिरी येथील पोलिस मैदानावर १४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात २०१९ मध्ये पुलवामामध्ये शहीद झालेल्या ४० सीआरपीएफ जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार असून, रत्नागिरी जिल्ह्यातील चार शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.