rat15p18.jpg-
24678
रत्नागिरी : महाशिवरात्रीनिमित्त रविवारी श्री तृणबिंदूकेश्वराच्या पिंडीवर मुखवटा लावून आरास करण्यात आली.
rat15p19.jpg-
24679
रत्नागिरी : ग्रामदैवत श्री देव भैरी, तृणबिंदूकेश्वर मंदिरात दर्शनसाठी भाविकांची रिघ लागली.
rat15p20.jpg-
24680
रत्नागिरी : श्री तृणबिंदूकेश्वराच्या दर्शनासाठी मंदिरातील रांग.
(मकरंद पटवर्धन : सकाळ छायाचित्रसेवा)
श्री तृणबिंदूकेश्वर मंदिरात शिवशंभोचा गजर
हजारो भाविकांची गर्दी; ग्रामदैवत श्री देव भैरीचेही दर्शन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १५ : झाडगाव येथील श्रीदेव भैरी देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने ग्रामदैवत श्री देव भैरी व श्री तृणबिंदूकेश्वर मंदिरात आज दिवसभर महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी शिवशंभोचा गजर केला. गोड आणि खड्या आवाजातील विविध मंडळांची भजने, पालखीसह भोवत्या आणि महाप्रसाद असे अनेक कार्यक्रम दिवसभर रंगले. पहाटेपासूनच भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. ‘हर हर महादेव’च्या जयघोषात परिसर दुमदुमून गेला.
उत्सवानिमित्त देवाची आकर्षक सजावट करण्यात आली होती. फुलांनी व रोषणाईने सजविलेल्या तृणबिंदूकेश्वराच्या पालखीसह भोवत्या घालण्यात आल्या. यात महिला, पुरुष व युवक सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात व टाळ-मृदुंगाच्या निनादात भोवत्या रंगल्या.
उत्सवाची सुरुवात सकाळी ७.३० वाजता देवस्थानच्या वतीने गावाचा अभिषेक (लघुरुद्र) करून झाली. त्यानंतर दिवसभर विविध भजन व कीर्तनांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. सकाळी १० वाजता वेळेत बुवा दामोदर लोकरे (श्री दत्तप्रसादिक भजन मंडळ, पूर्णगड) यांची भजने ऐकण्यासाठी भाविकांची गर्दी झाली. त्यांच्या गोड आवाजातील अनेक भजने ऐकून भाविकांचे कान तृप्त झाले. दुपारी १२ वाजता बुवा नारायण मिरजुळकर (जय हनुमान प्रा. भ. मंडळ, गावडे आंबेरे), दुपारी २ वाजता बुवा शुभम वायंगणकर (श्री स्वामी समर्थ प्रा. भ. मंडळ, आंबेशेत) यांचे भजन झाले.
दुपारी ३.३० वाजता अमृता नवाथे यांनी कीर्तन सादर केले. सायंकाळी ४.३० वाजता स्वानंद भजन मंडळाच्या उमा जोशी व सहकारी महिलांचे सुश्राव्य झाले. सायंकाळी ६ या वेळेत बुवा विजय मयेकर (जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ, कोतवडे), रात्री ८ वाजता बुवा अजय पिलणकर (श्री भैरव प्रा. भ. मंडळ, मुरुगवाडा) आणि रात्री १० वाजता सुदेशबुवा नागवेकर, बुवा साईनाथ नागवेकर (श्री दत्तप्रसादिक भजन मंडळ, घुडेवठार) यांचे पारंपरिक भजन सादर झाले. रात्री १२ वाजता पालखीसह मंदिराला भोवत्या घालण्यात आल्या. दुपारी ११ वाजल्यापासून सायंकाळपर्यंत खिचडी प्रसादाचे आयोजन करण्यात आले. जवळपास सहा ते सात हजार भाविकांनी याचा लाभ घेतला.