डॉ. शरद प्रभुदेसाई
परीवर्तन---------लोगो
(१२ फेब्रुवारी टुडे ३)
गावदेवळाच्या आवारात
‘चौकरण चाळवले’
देवानेच चोराला चोरीचा माल आणून टाकण्याची बुद्धी दिली, असा समज गावकऱ्यांचा आणि बाबांचाही झाला. ‘श्री’च्या बालमनाला हे सर्व नवलच वाटले. देवाला गाऱ्हाणे घातल्यावर चोर घाबरून चोरीचा माल आणून टाकतो कसा काय? गावदेव एखाद्या माणसाला केवढा मोठा दणका देऊ शकतो! त्या देवाला गावकरी घाबरून पूर्वापार चालत आलेल्या रूढींच पालन करतात. हे सर्व योग्य आहे याबाबत ‘श्री’ची खात्री पटते. एकंदरीत गावदेवाची करणी अगाध आहे तर! गावदेवळात साजरे होणारे विविध विधी, सण तसेच साजरे होणे इष्ट आहे, असेच त्याला वाटू लागले.
- rat१८p३.jpg-
P२६O२५३६६
- डॉ. शरद प्रभुदेसाई
----
गावदेऊळ महाकालीचे होते; पण देवळात महाकालीची मूर्ती नव्हती. थोडक्यात, देवाचे आसन रिक्त होते. फार पूर्वी झालेल्या वादामुळे खोताच्या पूर्वजांनी देवळातील मूर्ती काढून नेल्या. कारण काय तर त्याला म्हणे हे देऊळच मान्य नव्हते. म्हणून आपल्याला मान्य असलेल्या देवळात मूर्ती स्थापन करण्याच्या हेतूपोटी त्याने देवीची मूर्ती चोरली. अशी गोष्ट बाबा सांगत असत. यावर गावकऱ्यांचाही विश्वास होता. ही चोरलेली मूर्ती पूर्वजाने श्रीच्या घरात देवघराचे मागे भिंतीला उभी करून ठेवलेली होती. त्या देवीचे तोंड खोताच्या देवाच्या विरूद्ध बाजूला होते. त्यांचे तोंड एकमेकासमोर करणे म्हणजे वाडीवर संकट ओढवून घेण्यासारखे होते. ही देवी देवळातीलच आहे, हे बाबा ठामपणे सांगत आणि तिची गावदेवळात प्रतिष्ठापना करायला हवी, असे त्याचे मत होते; पण हे करताना या देवीचे तोंड खोताच्या देवासमोर येणार कारण, गावदेऊळ पूर्वाभिमुख तर खोताचा देव्हारा पश्चिमाभिमुख होता. त्यामुळे ही देवी देवळात स्थापन कशी करायची, कुणी करायची आणि असे केल्याने संकट आले तर काय, या सगळ्या गोष्टींचा विचार होणे गरजेचे होते.
मग यासाठी बऱ्याच बुजुर्ग मंडळींचा सल्ला घेण्यात आला. यामधे दशग्रंथी ब्राह्मण तसेच देवभगतांचा समावेश होता. काही विधी केल्यावर अशी मूर्ती मंदिरात स्थापन करायला हरकत नसल्याचा त्यांनी निर्वाळा दिला. देवभगतांनी कौल लावून देवीशी थेट संवाद केला आणि देवीचा विचार घेतला. अशी मूर्तिस्थापना करण्यास त्यांनीही परवानगी दिली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आणखी काही देवभगतांची मते आजमावण्यात आली. त्यांनीही कौल लावून काही विधी करून मूर्तिस्थापनेला परवानगी दिली. अशाप्रकारे विविध लोकांकडून मते घेतल्यानंतर देवीच्या मूर्तिस्थापनेसंबंधी निर्णय घेण्यासाठी गावकऱ्यांची सभा बोलावण्यात आली. त्या सभेत सविस्तर चर्चेअंती मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. त्यासाठी पैशाची जमवाजमव करण्यासाठी बाबा आणि गावकऱ्यांनी सुरुवात केली. या सर्व गोष्टींचा श्री मूकप्रेक्षक होता. देवाच्या करणीची व्याप्ती आजमावत होता.
देवीच्या प्रतिष्ठापनेचा कौल मिळाला. पैशाचीही गावकऱ्यांनी जमवाजमव केली. त्याचवेळी ‘श्री’ची मुंबईत शिक्षण घेत असलेली बहीण गंभीर आजारी झाली. त्यातच तिचे देहावसान झाले. त्या वेळी श्रीचे आई-बाबा मुंबईला गेले. ते मुंबईहून आल्यावर देवीच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा बेत रहित झाला. श्रीला त्याचे कारण कळळे नाही; पण याबाबत गावकऱ्यांमध्ये होत असलेली चर्चा त्याने ऐकली. त्यांचे म्हणणे असे होते. देवीच्या मूर्तीचा घाट घातल्यानेच श्रीची बहीण, खोताची लेक मरण पावली. आता आणखी विषाची परीक्षा घेण्यास कोणी तयार नव्हता म्हणून हा बेत रहित केला. अर्थात, असा त्यांचा ग्रह करून देण्यात बाबांचा महत्वाचा भाग होता. देवाचे नियम योग्यप्रकारे पाळले नाही की, देव अशाप्रकारे शिक्षा देतो. याबाबत ‘श्री’चे मत पक्के झाले. आपण करत असलेल्या देवभक्तीचा महिमा अगाध असतो. ती तशीच चालू ठेवली पाहिजे, हे ‘श्री’च्या मानावर ठसले.
एकदा ‘श्री’च्या आगारातील पोफळीच्या झाडावरील पोफळी चोरीला गेल्या. हे वाडीतीलच कोणाचेतरी काम असावे, असा बाबांचा कयास होता. पूर्वी अशी सुपाऱ्यांची चोरी होत असे; पण बाबांनी ती चोरी गंभीरतेने घेतली नव्हती; पण अलिकडे वरचेवर चोऱ्या होत होत्या. त्यामुळे बाबा बेचैन झाले. त्यातच काही वाडकऱ्यांचा बाबांना पाठिंबा होता. या चोऱ्या थांबवण्यासाठी काय करावे, असा सर्वांपुढे प्रश्न होता.
गावदेवळाच्या आवारात चौकरण चाळवणे असा देवाला गाऱ्हाणे घालण्याचा प्रकार पूर्वीपासून प्रचलित आहे. वाडीत मोठा गुन्हा किंवा चोरी झाली आणि गुन्हेगार सापडत नसेल तर गुन्हेगाराला परस्पर शिक्षा व्हावी यासाठी खोत गाऱ्हाणे घाले. हे गाऱ्हाणे होळी उभी करतात तेथे घातले जाई. तेथे देव असतो त्याला या गाऱ्हाण्याने चाळवत. हा देव ताकदीचा होता. या देवाला गावकरी घाबरत. एक तर गुन्हा कबुल करत किंवा चोरीचा माल जागेवर आणून ठेवत. असे झाले नाही तर गुन्हेगाराला देव परस्पर शिक्षा देई. या सुपारीच्या चोरीसंबंध गावकी (गावकऱ्याची सभा) भरली. चोरीसंबंधी चर्चा झाली. कोणीही चोरी कबूल करीना. वाडीत पूर्वी झालेल्या चोऱ्यांचीही चर्चा झाली. कोणीही गुन्हा कबूल करण्यास तयार नव्हते. मग बाबा आणि गावकीच्या मतानुसार चौकरण चाळवण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व वाडकरी आणि बाबांनी देवळात जाऊन योग्य ती कारवाई केली. श्री बाबांबरोबर होताच. चौकरण चाळवल्याची बातमी गावात पसरली होतीच. बाबांनी उचललेले हे कठोर पाऊल! खोतकीच्या अधिकाराचा अशाप्रकारचा वापर बहुधा त्यानी पहिल्यांदाच केला होता. त्यामुळे त्यांनाही त्याबाबत कुतूहल होते. ते सर्वांना याबाबत सांगत. आता चोराची धडगत नाही असेच सर्वांना वाटत होते.
चौकरण चाळवल्यानंतर दोन-तीन दिवसानंतर चोरलेल्या सुपाऱ्या चोराने आगरात आणून टाकल्याचे आढळले; पण चोराचा पत्ता लागला नाही. चोराला चौकरण चाळवल्याची भीती वाटली आणि त्याने चोरीचा माल आणून टाकला. चोर नामानिराळा राहिला. चोरीच्या पातकातून आपली सुटका झाली, असे त्याला वाटले. शेवटी जीवन हा पाप-पुण्याचा खेळ!
(लेखक बालरोगतज्ज्ञ आणि चिंतनशील अभ्यासक आहेत.)
------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.