२५५९५
जिल्ह्यात शिवरायांना वंदन
शिवजयंतीनिमित्त चैतन्य ः ढोलताशांच्या गजरात मिरवणुका; छत्रपतींचा जयजयकार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ : सह्याद्रीच्या कडाकडांमधून घुमणारा ''जय भवानी, जय शिवाजी''चा जयघोष, ढोलताशांचा निनाद, लेझीमचा ताल आणि भगव्या पताकांनी न्हाऊन शहरांमधील शिवरायांच्या पुतळ्यांचा परिसर....अशा उत्साही वातावरणात रत्नागिरी जिल्ह्यात गुरुवारी (ता. १९) शिवजयंती साजरी करण्यात आली. जिल्हा प्रशासनाची पदयात्रा, किल्ले अजिंक्यताऱ्यावरून आलेली शिवज्योत, हर्णै येथील सुवर्णदुर्ग किल्ल्यावरील कार्यक्रम आणि शालेय विद्यार्थ्यांच्या प्रेरणादायी आविष्काराने सजलेले वेगवेगळे उपक्रम जिल्ह्यात राबवण्यात आले. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात शिवरायांचे स्मरण करण्यात आले.
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी जिल्ह्यात शिवजयंतीचा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. रत्नागिरी शहरात काढण्यात आलेल्या पदयात्रेत पारंपरिक पोशाखातील विद्यार्थी आणि लेझीम पथकांच्या सहभागामुळे संपूर्ण शहर शिवमय झाले होते. पोलिस बँडने दिलेली विशेष सलामी या सोहळ्याचे आकर्षण ठरली. संगमेश्वरमध्ये व्यापारी पैसाफंड इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मिरवणूक काढली. महाराजांच्या सुशासनाचे आदर्श युवकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने काढलेल्या या मिरवणुकीचे बाजारपेठेत जल्लोषात स्वागत झाले. चिपळूणमध्ये रिगल एज्युकेशन सोसायटीच्या सीबीएसई स्कूलमध्ये शिवकालीन सजावट आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीच रसिकांना मिळाली. यावेळी डॉ. सुमिता शिर्के यांनी शिवरायांची व्यवस्थापन कौशल्ये आत्मसात करण्याचे आवाहन केले. चिमुकल्यांनी सादर केलेल्या शिवगर्जना, पोवाडा आणि पाळणा नृत्याने कार्यक्रमात रंग भरला. चिपळूणमध्ये तालुका स्पोर्ट अकॅडमीच्या वतीने सलग २२ व्या वर्षी शिवज्योतीचे आयोजन करण्यात आले. सातारा येथील अजिंक्यतारा किल्ल्यावरून आणलेली ही शिवज्योत शहरात दाखल झाल्यावर पवन तलाव परिसरात तिचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
कानाकोपऱ्यांतून
घुमला जयघोष
जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेल्या कार्यक्रमांतून शिवरायांच्या पराक्रमाची गाथा नव्या पिढीसमोर उलगडण्यात आली. ''जय भवानी, जय शिवाजी''च्या जयघोषाने रत्नागिरीचा कानाकोपरा दुमदुमून गेला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.