गिरणी कामगार संघटना
विधानभवनावर धडकणार
चिपळुणात बैठक ; मुंबईत घरे देण्याचा अध्यादेश काढा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २० ः गिरणी कामगार संयुक्त लढा समितीतर्फे १० मार्च रोजी सकाळी ११ वा. विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील गिरणी कामगारांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंद मोहिते यांनी केले.
विधानभवनावर काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोहिते यांनी काल (ता. १९) चिपळूण येथे गिरणी कामगारांची आंबेडकर भवनात बैठक घेतली. या वेळी उत्तर रत्नागिरीतील गिरणी कामगार व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. या वेळी मोहिते म्हणाले, सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करताना आता मुंबईतच घरे दिली पाहिजेत, अशी मागणी लावून धरण्यात येईल. रखडलेल्या घरांच्या प्रश्नावर ९ जुलै २०२५ रोजी विधानभवनावर गिरणी कामगार संयुक्त लढा समितीच्यावतीने आंदोलन छेडण्यात आले होते, ते अभूतपूर्व ठरले. दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक आश्वासन दिले; पण ते कागदावरच राहिले. त्याच्या अंमलबजावणीसाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी आठवण मोर्चा काढण्यात आला. नगरविकास खात्याचे प्रधान सचिव असिम गुप्ता तसेच अन्य नेत्यांच्याही भेटी घेण्यात आल्या; पण सरकारकडून अद्यापपर्यंत सकारात्मक कार्यवाही झालेली नाही. सरकारने गिरणी कामगारांना मुंबईतच घरे देण्याचा अध्यादेश काढावा आणि यापूर्वीचा नकारात्मक अध्यादेश रद्द करावा, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच हे आंदोलन निर्णायक आणि व्यापक ठरावे, यासाठी लढ्याचे प्रमुख आमदार सचिन अहिर यांच्या पुढाकाराने आणि येत्या अधिवेशनात घरांच्या प्रश्नावर दोन्ही सभागृहात आवाज उठवला जावा यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. खेड्यामधील गिरणी कामगारांमध्ये किंवा लोकप्रतिनिधींमध्ये आंदोलनाबाबत जनजागृती निर्माण व्हावी यासाठी तालुका किंवा जिल्हास्तरावर प्रयत्न सुरू आहेत. असे मोहिते यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.