25934
25935
वस्तू प्रदर्शनातून शिवशौर्याचा अनुभव
मळगावमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद; राणे यांच्या कल्पकतेचे कौतुक
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २० ः मळगाव-रस्तावाडी येथील शिवभक्त ज्ञानेश्वर राणे यांच्या निवासस्थानी शिवजयंतीनिमित्त आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा प्रेरणादायी वातावरणात पार पडला. या उपक्रमाचे यंदाचे सलग आठवे वर्ष असून, शिवकालीन इतिहासाचे संवर्धन व पुढील पिढीपर्यंत तो प्रभावीपणे पोहोचावा, या संकल्पनेतून हा उपक्रम सातत्याने राबवला जात आहे.
शिवजयंतीनिमित्त खास राणे यांच्या संकल्पनेतून शिवकालीन दुर्मीळ ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. सकाळपासूनच या प्रदर्शनास सुरुवात झाली असून हे प्रदर्शन रात्री दहापर्यंत खुले ठेवण्यात येणार आहे. या प्रदर्शनामध्ये शिवकालीन इतिहासाचे विविध पैलू जिवंत करणाऱ्या निवडक व दुर्मीळ प्रतिकृती आहेत. मराठा आरमाराच्या सामर्थ्याचे दर्शन घडविणाऱ्या मराठा आरमारातील तब्बल आठ जहाजांच्या प्रतिकृती तसेच जहाजांवर वापरण्यात येणाऱ्या तोफांच्या प्रतिकृती हे प्रदर्शनाचे विशेष आकर्षण ठरले.
दरम्यान, राणे यांनी आतापर्यंत जिल्ह्यातील ७१ जिल्हा परिषद शाळांमध्ये भेट देत या सर्व ऐतिहासिक वस्तूंची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली आहे. यापुढेही ऐतिहासिक, शैक्षणिक व प्रेरणादायी उपक्रम सातत्याने राबवले जातील, असे त्यांनी सांगितले. दिवसभरात मळगावसह पंचक्रोशीतील शिवभक्त, इतिहासप्रेमी, अभ्यासक, विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देत प्रदर्शनाचा लाभ घेतला.
----
शस्त्रे आणि छायाचित्रे लक्षवेधी
मराठ्यांच्या शस्त्रागारातील प्रमुख शस्त्र असलेली मराठा धोप, मावळ्यांच्या शौर्याचे प्रतीक असलेली वर्क धोप, शिवइतिहासातील अत्यंत महत्त्वाचा क्षण असलेल्या अफजलखान वधप्रसंगी वापरलेली वाघनखे व कट्यार यांच्या प्रतिकृतींनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. यासोबतच, मराठा आरमार ग्रंथातील २२ ऐतिहासिक छायाचित्रांचे प्रदर्शन, पावनखिंडीत पराक्रम गाजवून बलिदान दिलेल्या बाजीप्रभू देशपांडे यांची ऐतिहासिक वंशावळ व दांडपट्टा, शिवकालीन संदर्भ ग्रंथ, मराठा शस्त्रागारातील उर्मी व दांडपट्टा यांसारखी शस्त्रे अभ्यासकांसाठी विशेष ठरली.
---
शिवकालीन इतिसाहासाची अनुभूती
प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अस्सल पेहराव दर्शविणारी दुर्मीळ छायाचित्रे, ऐतिहासिक शिक्क्यांचे मजकूर, गोमंतकीय भागातील दुर्गांची माहिती, छत्रपती संभाजी महाराज यांचे हस्ताक्षर, मनुची संग्रहातील शिवाजी महाराजांची छायाचित्रे तसेच ऐतिहासिक नाण्यांचे विशेष प्रदर्शनही मांडले होते.
या प्रदर्शनामुळे उपस्थितांना शिवकालीन इतिहास प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळाली. राणे यांनी शिवजयंतीनिमित्त मांडलेले हे प्रदर्शन एक दिवसाचे शिवअभ्यास पर्व असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.