25999
मुलांना जाणीवपूर्वक वाचनाची गोडी लावा
कल्पना मलये : कट्टा येथे बौद्ध महासभेतर्फे संयुक्त जयंती
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २० : आजच्या धावपळीच्या युगात युवा पिढीमध्ये वाचनाचे प्रमाण चिंताजनकरीत्या कमी झाले आहे. वाचनाअभावी तरुणांचा समाजाशी असणारा संवाद तुटत चालला असून, सभोवतालच्या घडामोडींचे ज्ञान त्यांना मिळेनासे झाले आहे. हा विसंवाद टाळण्यासाठी पालकांनी जाणीवपूर्वक मुलांना वाचनाची सवय लावणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका कल्पना मलये यांनी कट्टा येथे केले.
भारतीय बौद्ध महासभा तालुका महिला शाखा मालवण यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, कट्टा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ व त्यागमूर्ती माता रमाई यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेहा काळसेकर होत्या.
या सोहळ्याला जिल्हा सरचिटणीस संजय पेंडुरकर, महिला संस्कार उपाध्यक्षा स्नेहा पेंडुरकर, जिल्हा संस्कार सचिव विलास वळंजू, जिल्हा महिला संरक्षण उपाध्यक्ष प्रीतम जाधव, तालुकाध्यक्ष रविकांत कदम, आरपीआय जिल्हाध्यक्ष अजित कदम, प्रकाश पवार, भगवान जाधव, नचिकित पवार, सचिन कासले, संग्राम कासले, मिलिंद पवार, लक्ष्मण तळेगावकर, भानुदास तळगावकर, शंकर कदम, भरत पेंडुरकर, लीना तळगावकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे, लहान मुलांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, माता रमाई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभूषा करून त्यांच्या व्यक्तिरेखा जिवंत केल्या. स्नेहा पेंडुरकर यांनी प्रास्ताविक केले. तृप्ती कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.
---
महामानवांच्या विचारांचा प्रसार करा!
श्रीमती मलये म्हणाल्या, ‘‘आजच्या महिला जे सुखी आणि सन्मानाचे जीवन जगत आहेत, त्यामागे सावित्रीबाई फुले, जिजाऊ आणि माता रमाई यांचा मोठा संघर्ष आहे. त्यांचा त्याग आपल्या संघर्षापेक्षा कित्येक पटीने मोठा होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मताधिकारामुळेच महिलांना समाजात स्वतंत्र अस्तित्व निर्माण करता आले. त्यामुळे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही मूल्ये रुजवण्यासाठी महामानवांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणे ही प्रत्येक महिलेची जबाबदारी आहे.’’