जलवाहिनीचे काम बंद पाडू
कोलगावातील बैठकीत इशारा; पाणीप्रश्नी सर्वपक्षीय एकवटले
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १ ः पाळणेकोंड धरणासाठी जमिनी देऊनही कोलगाव आणि कुणकेरी गावे आजही तहानलेलीच आहेत. जोपर्यंत कोलगावच्या पाण्याची कायमस्वरुपी व्यवस्था होत नाही, तोपर्यंत गावाच्या हद्दीतून कोणतीही नवीन पाण्याची पाईपलाईन नेऊ दिली जाणार नाही, असा इशारा जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा यांनी दिला आहे. याबाबत कोलगाव येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत आंदोलनाचा निर्धार करण्यात आला.
सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणारे पाळणेकोंड धरण कोलगावच्या हद्दीत आहे. या धरणासाठी कोलगावमधील शेकडो एकर जमीन संपादित झाली असून, एक संपूर्ण वाडी विस्थापित झाली आहे. शुद्धीकरण केंद्र कुणकेरी गावात असूनही या दोन्ही गावांना धरणाचा कोणताही फायदा झालेला नाही. आम्ही अनेक वर्षे सावंतवाडी शहराला पाणी देण्यासाठी सहकार्य केले, परंतु आज आमचेच गाव पाण्यापासून वंचित आहे, अशी व्यथा ग्रामस्थांनी मांडली.
कोलगाव येथे काल (ता. २८) डिसोजा यांच्या नेतृत्वाखाली गावातील ज्येष्ठ नागरिक आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत जोपर्यंत गावाचा पाणीप्रश्न सुटत नाही, तोपर्यंत नवीन पाईपलाईनचे काम बंद पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रशासनाने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा आणि सर्वपक्षीय ग्रामस्थांनी एकत्र येऊन लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
---
कोट
28002
माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी आम्हाला केवळ भूलथापा आणि खोटी आश्वासने देऊन आमच्या तोंडचे पाणी हिरावले आहे. कोलगाव ग्रामपंचायतीसोबत दिशाभूल करणारे करार करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात पाणी मिळालेच नाही. आता नवीन पाईपलाईनचे काम सुरू होत असताना, आम्ही आमच्या हक्कांसाठी ठाम राहणार आहोत.
- मायकल डिसोजा, सदस्य, जिल्हा परिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.