swt332.jpg मध्ये फोटो आहे.
28407
कतार ः येथील भारतीय युवकांच्या मोबाईलवर अलर्टचा संदेश देण्यात आला आहे.
swt333.jpg मध्ये फोटो आहे.
28408
कतार ः मुख्य रस्ते सुनेसुने झाले आहेत.
आखातातील सिंधुदुर्गवासी तणावाखाली
अमेरिका-इराण संघर्ष : आतापर्यंत ११ जण तातडीच्या मदतीच्या प्रतीक्षेत
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ३ : कतारसह आखाती देशात नोकरीसाठी गेलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवासी भीतीच्या छायेखाली आहेत. इराण-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणने अमेरिकेच्या हवाई तळावर हल्ला केल्याच्या घटनेमुळे येथे सतर्कता वाढली आहे. जिल्हा प्रशासनाकडे आतापर्यंत एकूण १०२ नागरिकांची माहिती प्राप्त झाली आहे. त्यापैकी ११ नागरिकांना तातडीच्या मदतीची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले असून, त्यांच्या नावांची यादी राज्य शासनाला पाठविण्यात आलेली आहे.
सिंधुदुर्गातील अनेक जण नोकरीसाठी आखातात स्थिरावले आहेत. विशेषतः कतारमध्ये असलेल्यांची संख्या जास्त आहे. तेथे निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांची माहिती तातडीने संकलित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा तृप्ती धोडमिसे यांनी महसूल व पोलिस विभागाला दिले आहेत. त्यानुसार तालुका व जिल्हास्तरावर माहिती संकलनाचे काम युद्धपातळीवर सुरू असून, संकलित माहिती राज्य शासनाकडे सादर करण्यात आलेली आहे.
दरम्यान, बांदा येथील वासिम आगा हे सध्या कतारमधील सान्या परिसरात नोकरीनिमित्त वास्तव्यास आहेत. त्यांच्या मोबाईलवरही स्थानिक प्रशासनाकडून आपत्कालीन इशारा संदेश प्राप्त झाला आहे. या संदेशात, ''धोक्याची स्थिती संपेपर्यंत घरात किंवा सुरक्षित ठिकाणीच थांबा. अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडू नका,'' अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
आखातामध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिक वास्तव्यास आहेत. या घडामोडींमुळे भारतीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आखाती देशांतील परिस्थितीवर जिल्हा प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून असून, केंद्र व राज्याशी सातत्याने समन्वय साधला जात आहे. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाशी संपर्क ठेवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी केले आहे. आतापर्यंत आखातात कार्यरत १०२ सिंधुदुर्गवासीयांची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली आहे. यातील ११ जणांना तातडीच्या मदतीची गरज आहे. त्यांचे तपशील प्रशासनाने राज्य सरकारला कळविले आहेत.
दरम्यान, आखातातील या वाढत्या तणावाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले असून, पुढील काही दिवस परिस्थिती कशी राहते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. कतारमधील भारतीय नागरिकांनी भारतीय दुतावासाच्या सूचनांकडे लक्ष देऊन आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
.....................
चौकट
जिल्हा मुख्यालयात नियंत्रण कक्ष सक्रिय
नागरिकांच्या मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे (०२३६२) २२८८४७/१०७७ तसेच पोलिस अधीक्षक कार्यालय, सिंधुदुर्ग येथे (०२३६२) २२८६१४ या क्रमांकांवर नियंत्रण कक्ष कार्यरत आहे. संबंधितांनी अधिक माहितीसाठी या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
.......................
कोट
अचानक मोबाईलवर ''नॅशनल इमर्जन्सी अलर्ट'' असा संदेश आला. प्रशासनाने खबरदारी म्हणून घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या आहेत. येथे सर्वत्र सतर्कता वाढवण्यात आली असून, नागरिकांनी शांत राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
- वासिम आगा, मूळ बांदा, सध्या रा. कतार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.