संगलट बीएसएनएल टॉवर बंद
खेड, ता. ५ : तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील संगलट येथील बीएसएनएल टॉवर गेल्या नऊ महिन्यांपासून बंद असल्यामुळे मोबाईल सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाचा ग्राहकांना फटका बसत आहे. त्यामुळे ग्राहकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
संगलट येथील बीएसएनएल टॉवरमुळे पंचक्रोशीतील ग्राहकांना फायदा होतो. मात्र टॉवरच गेल्या ९ महिन्यांपासून बंद असल्याने संवादाची देवाणघेवाण करण्यात अडथळे निर्माण होत आहे. बहुतांश ग्राहकांनी बीएसएनएलची सेवा खरेदी केली आहे. या सेवेचा फज्जा उडाल्याने सेवा असून नसल्यासारखीच आहे. याबाबत अधिकाऱ्यांकडे तक्रारी करून देखील कोणतीच ठोस पावले उचलली जात नाहीत. यामुळे बंदावस्थेतील टॉवर तातडीने कार्यान्वित न झाल्यास बीएसएनएल कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याच्या तयारीत ग्राहक आहेत.
---
भाज खेड शहर अध्यक्षपदी साळवी
खेड, ता. ५ : भारतीय जनता पार्टी खेड शहराध्यक्षपदी नंदू साळवी यांची निवड झाली आहे. याबद्दल माजी नगराध्यक्ष अॅड. वैभव खेडेकर, नगरसेविका वैभवी खेडेकर यांनी सत्कार केला. या वेळी भाजप अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष व नगरसेवक तथा गटनेते रहीम सहिबोले , युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस अँड मिलिंद नांदगांवकर, उपस्थित होते.
-----
जादा बसफेऱ्यांचे आरक्षण ‘फुल्ल’
खेड, ता. ५ : शिमगोत्सवासाठी गावी येणाऱ्या मुंबईकरांसाठी लालपरी सज्ज झाली आहे. कोकणात येणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने १९८ जादा बसफेऱ्यांचे नियोजन केले आहे. या बसफेऱ्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. ७८ पैकी ३९ बसचे समूह आरक्षण झाले आहे. ५७ फेऱ्या ग्रुप बुकिंग आरक्षणासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. कोकणवासियांच्या मार्गात कोणत्याही प्रकारचा अडथळा येवू नये, यासाठी एसटी प्रशासनाकडून चोख नियोजन करण्यात आले आहे.
रेल्वे प्रशासनापाठोपाठ एसटी प्रशासनानेही कोकणवास्यांच्या सेवेसाठी मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, बोरिवली, ठाणे, वसई, नालासोपारा, पनवेल येथील बसस्थानकातून जादा बसफेऱ्या कोकणात दाखल होणार आहेत. या बसफेऱ्या नियमित फेऱ्यांव्यतिरिक्त असून कोकणवासियांनी ग्रुप बुकिंगला सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. मुंबई विभागातून सुटणाऱ्या ७८ तर ठाणेतून सुटणाऱ्या ९१ जादा बसफेऱ्यांचे आरक्षण फुल्ल आहे. मुंबई, ठाणे, पालघर या भागातून गावी दाखल होणाऱ्या कोकणवासियांची संख्या सर्वाधिक आहे. यामुळे एसटी प्रशासनाने आणखी जादा बसफेऱ्या सोडाव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे. २७फेब्रुवारीपासून जादा बसफेऱ्या कोकणात दाखल होऊ लागल्या आहेत.
----
करिअर कट्ट्यात‘आयसीएस’चा डंका
खेड, ता. ५ : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करिअर कट्टा च्या विविध उपक्रमांचा पारितोषिक वितरण कार्यक्रम मुंबई येथील यशवंतराव चव्हाण केंद्रात झाला. उद्योगमंत्री उदय सामंत आणि खादी ग्रामोद्योग विभागाचे सभापती रवींद्र साठे यांच्या हस्ते राज्यातील विविध महाविद्यालयांना सन्मानित करण्यात आले. त्यात ‘आयसीएस’ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा सहभाग आहे. या महाविद्यालयाने सौरऊर्जा जनजागृती या उपक्रमात प्रथम क्रमांक आणि एडब्ल्युएस करियर या उपक्रमात विशेष कामगिरी नोंदविली होती. या स्पर्धेत उत्कृष्ट करिअर संसद या विभागात आयसीएस महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावून जिल्ह्यात मानाचा तुरा रोवला आहे. तसेच उत्कृष्ट महाविद्यालय या विभागात महाविद्यालयाने जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. याशिवाय करिअर कट्टा उपक्रम राबविणारे उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून या महाविद्यालयाच्या प्रतिनिधी प्राचार्या डॉ. अनिता आवटी व डॉ. चंद्रशेखर साळुंखे यांना विशेष सन्मानित करण्यात आले. या यशाबद्दल महाविद्यालयातील प्राध्यापक, समन्वयक, विद्यार्थी तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेश बुटाला महाविद्यालयाच्या विकास समितीचे अध्यक्ष ॲड. आनंदराव भोसले तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.