कसब्यात छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक
अर्थसंकल्पात घोषणा ; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ६ ः चिपळूण–संगमेश्वर मतदारसंघातील कसबा येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य स्मारकाची राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. या घोषणेचे स्वागत करत आमदार शेखर निकम यांनी महायुती सरकारचे अभिनंदन केले असून, रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणवासीयांच्या अस्मितेचा प्रश्न मार्गी लागल्याची भावना व्यक्त केली आहे.
कसबा (संगमेश्वर) येथे जागतिक दर्जाचे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचा ध्यास तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी घेतला होता. या स्मारकासाठी सुमारे ३१२ कोटी रुपयांचा भव्य आराखडा तयार करण्यात आला आहे. मध्यंतरी स्वतः अजित पवार यांनी कसबा येथे प्रत्यक्ष भेट देऊन स्मारक स्थळाची पाहणी केली होती आणि निधीचे आश्वासन दिले होते. शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात केलेल्या घोषणेमुळे या प्रकल्पाचा नियोजन आराखडा आता अंतिम टप्प्यात आला असून, प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.
या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल प्रतिक्रिया देताना आमदार शेखर निकम म्हणाले की, ‘छत्रपती संभाजी महाराजांचे हे स्मारक केवळ ऐतिहासिक वारसा नसून ते येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल. अजित पवार यांनी पाहिलेले स्वप्न आता पूर्णत्वास जात आहे, याचा सार्थ अभिमान वाटतो.’
यावेळी आमदार निकम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, पालकमंत्री उदय सामंत, गृह राज्यमंत्री योगेश कदम, आमदार किरण सामंत तसेच माजी आमदार प्रमोद जठार यांचे विशेष आभार मानले. महायुती सरकारच्या या निर्णयामुळे कोकणातील सांस्कृतिक आणि पर्यटन विकासाला मोठी गती मिळणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.