29962
मुलींसाठी ‘एच.पी.व्ही.’ लस आरोग्यदायी
जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन; जिल्ह्यात लसीकरण मोहीम
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १० : सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जिल्ह्यातील पात्र वयोगटातील मुलींना त्यांच्या सुरक्षित आरोग्यासाठी एच.पी.व्ही. लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले आहे. गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळविण्यासाठी एच.पी.व्ही. लस अत्यंत प्रभावी आणि सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये या लसीचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असून, ती सुरक्षित व परिणामकारक असल्याचे सिद्ध झाले आहे. जिल्हाधिकारी धोडमिसे म्हणाल्या, ‘‘एच.पी.व्ही. लसीकरणामुळे मासिक पाळीवर कोणताही विपरित परिणाम होत नाही. प्रजनन क्षमतेवरही कोणताही परिणाम होत नाही. यासंदर्भात समाजात पसरलेल्या चुकीच्या समजुतींना किंवा अफवांना पालकांनी बळी पडू नये.’’
जिल्ह्यातील शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच उपकेंद्रांमार्फत पात्र मुलींसाठी लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या माध्यमातून या लसीकरणाबाबत जनजागृतीही करण्यात येत आहे. शालेय स्तरावरही विद्यार्थिनी आणि पालकांना या लसीचे महत्त्व समजावून सांगितले जात आहे.
------
...म्हणून एच.पी.व्ही. महत्वाची!
गर्भाशय मुखाचा कर्करोग हा महिलांमध्ये आढळणाऱ्या गंभीर आजारांपैकी एक मानला जातो. मात्र, योग्य वयात एच.पी.व्ही. लसीकरण केल्यास या आजाराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने पुढाकार घेत लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी केले.
.......................
अशी मिळणार लस!
* पात्रता : ९ ते १४ वर्षे वयोगटातील मुली (शासकीय निकषानुसार प्रामुख्याने १४ वर्षांपर्यंतच्या मुली)
* लसीकरण केंद्रे : जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे
* नोंदणी : शासनाच्या यू-विन पोर्टलद्वारे नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे.
.......................
कोट
जिल्ह्यातील सर्व पालकांनी आपल्या मुलींच्या सुरक्षित भविष्यासाठी या लसीकरण मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा. जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन पात्र मुलींनी लस टोचून घ्यावी.
- तृप्ती धोडमिसे, जिल्हाधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.