कॉल लागेना, इंटरनेट सेवाही मिळेना
बीएसएनएल ‘नॉटरिचेबल’; रिचार्ज दर वधारल्याने संताप
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २० ः एकेकाळी संपर्कासाठी प्रभावी म्हणून ओळख असलेली बीएसएनएलची मोबाईल सेवा सध्या रोडावल्यासारखी झाली आहे. हमखास संपर्क करण्यासाठी प्रयत्न करावा तर समोरच्याशी बोलणेच होत नाही, अशी अवस्था आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी असून अनेकांना आता बीएसएनएल सेवेचा वीट आल्याचे चित्र आहे. सेवा सुधारण्यासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसत नसल्याने भविष्यात ग्राहक संख्या कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रिचार्ज दरही वधारल्याने कुठे आहेत ते ‘अच्छे दिन’ अशी म्हणण्याची वेळ आता ग्राहकांवर येऊ शकते.
पूर्वी टपालाद्वारे पत्राने संदेश देण्याच्या सोयीनंतर जलद म्हणून तार सेवेचा उपयोग होत असे. त्याला जोड म्हणून लँडलाईन सेवा आली. प्रमुख शहरांनंतर, जिल्हा, तालुका आणि पुढे गावपातळीवर लँडलाईन सेवा पोहोचली. त्याकाळी लँडलाईन फोन असणे श्रीमंतीचा थाट मानला जायचा. काळानुरुप मोबाईलचे जाळे विस्तारले आणि लँडलाईनची मागणी कमी झाली तरीही काही घरांमध्ये, विविध शासकीय कार्यालयांत लँडलाईन कायम होते. बीएसएनएल सेवेचा हा ‘शाही थाट’ असे. खासगी कंपन्याच्या आगमनाआधी ही सर्व सेवा बीएसएनएल प्रभावीपणे देत असे; मात्र अलीकडील काही वर्षांत बीएसएनएल सेवा बेभरवशी झाली आहे. पूर्ण क्षमतेने सेवा मिळत नसल्याने अनेकांनी लँडलाईन सेवेला ‘रामराम’ केला. त्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातील लँडलाईनचे प्रमाण कमी झाले. संपर्कासाठी मोबाईलचा सर्रास वापर वाढला; मात्र अलीकडे ही सेवाही पूर्णपणे कोलमडलेली असल्याने ग्राहकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. वारंवार प्रयत्न करूनही कॉल न लागणे, एकतर्फी संभाषण ऐकू येणे, मध्येच कॉल बंद पडणे किंवा बोलणे थांबणे अशा समस्यांमुळे ग्राहकांमध्ये नाराजी वाढत आहे. बीएसएनएल सेवा वधारल्याचे संदेश ग्राहकांना येत असतात; मात्र प्रत्यक्षात सेवेचा बोजवारा उडाला असल्याचे चित्र आहे. नेटही पूर्ण क्षमतेने मिळत नसल्याने कसलेच काम होत नसल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे खासगी सेवेचा आधार अनेकजण घेताना दिसतात. बीएसएनएल सेवेमध्ये सुधारणा होण्याची ग्राहकांची सातत्याने मागणी असते.
........................
डिजिटल सेवेचा बोजवारा
सध्या डिजिटल पेमेंट करण्यावर तरुणाईचा अधिक भर असतो. आता एसटी प्रवासातही तिकिटासाठी डिजिटल पेमेंट केले जाते; मात्र नेटवर्क समस्येमुळे डिजिटल व्यवहारावर मर्यादा येत असल्याने तरुणाईमध्ये नाराजीचा सूर आहे. वारंवार प्रयत्न करूनही व्यवहार पूर्णत्वास जात नसल्याने ग्राहक वैतागल्याचे चित्र आहे.
.........................
रिचार्ज दरही वधारले
सध्या बीएसएनएल मोबाईल रिचार्ज दर सर्वसामान्यांना परवडण्यापलीकडे गेले आहेत. सर्वसामान्यांची यातून कोंडी झाली आहे. रिचार्जचा वाढता खर्च असल्याने ‘खासगी सेवा बरी’ म्हणण्याची वेळ आता ग्राहकांवर येऊ शकते; मात्र याकडे कोणाचेही लक्ष नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.