34764
कामात हयगय, तर कठोर कारवाई
जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा; मतदार यादी ‘विशेष पुनरिक्षण’ मोहीम
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि सर्वसमावेशक करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहिमेला आजपासून सुरुवात झाली आहे. या मोहिमेत गाफील राहणाऱ्या किंवा कामात हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर केवळ नोटीस न देता थेट कठोर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिला.
कुडाळ येथे आयोजित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण आणि आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बीएलओंचा गौरवही करण्यात आला.
लोकशाहीचा पाया असलेल्या मतदार याद्यांच्या शुद्धीकरणासाठी ही मोहीम राबवण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने १८ वर्षे पूर्ण झालेल्या पात्र युवक-युवतींची नाव नोंदणी करणे, यादीतील नावातील चुका दुरुस्त करणे आणि स्थलांतरित नागरिकांची माहिती अद्ययावत करणे, मृत व्यक्ती आणि दुबार नावे शोधून ती यादीतून हटवणे, अशा कामांचा समावेश असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी स्पष्ट केले की, मतदार यादीचे काम हे अत्यंत महत्त्वाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. या कामात कोणत्याही स्तरावर निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. मोहिमेचा नियमित आढावा घेतला जाईल आणि कर्तव्य टाळणाऱ्यांवर गंभीर प्रशासकीय कारवाई केली जाईल, असे त्यांनी यावेळी खडसाविले. या बैठकीला उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, तहसीलदार सचिन पाटील, गणेश लव्हे यांसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.