कोकण

कोकणचा झंझावात

CD

swt99.jpg
36308
नारायण राणे

पुरवणी डोके : मा. खासदार नारायण राणे वाढदिवस विशेष

कोकणचा झंझावात

मुंबईत १९८५ मध्ये नगरसेवक बनलेल्या खासदार नारायण राणे यांनी पुढील काही वर्षांत राजकारणात अफाट वेगाने वाटचाल करत, देशातील सर्वात विकसित असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारली. मात्र, विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांचा दोन वेळा पराभव झाला, त्यावेळी विरोधकांनी ‘राणे आता संपले’ असे नॅरेटिव्ह पसरवले. परंतु, काही महिन्यांतच राणे यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेऊन पुन्हा एकदा देशाच्या राजकारणात आणि सत्ताकारणात आपली ताकद दाखवून दिली. दोन वर्षांपूर्वी झालेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीतही राणे यांनी प्रतिस्पर्धी ठाकरे शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांचा ५० हजार मतांनी पराभव करून, रत्नागिरी-सिंधुदुर्गात प्रथमच भाजपचा खासदार होण्याचा मान पटकावला. राणे यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. त्यांच्या शुक्रवारी (ता.१०) होणाऱ्या वाढदिवसानिमित्त त्यांचा हा झंझावात समजून घेण्याचा प्रयत्न...
-----------

हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे उजवे हात मानले जाणाऱ्या नारायण राणे यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर, नगरसेवकांपासून ते मुख्यमंत्री असा थक्क करणारा प्रवास करून दाखवला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील वरवडे गावचे सुपुत्र असलेले नारायण राणे यांचे कुटुंब शिक्षण आणि रोजगारासाठी मुंबईत गेले. सरकारी नोकरी सोडून शिवसेनेचे शाखाप्रमुख बनले, मग नगरसेवक म्हणून निवडून आले. मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट समितीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली आणि पुन्हा विधानसभा निवडणूक लढण्यासाठी ते आपल्या गावाकडे वळले. मालवण-कणकवली या विधानसभा मतदारसंघातून १९९० पासून ते २००५ पर्यंत त्यांनी पाच निवडणुका लढवल्या आणि वाढत जाणाऱ्या मताधिक्याने जिंकल्याही.
२००९ मध्ये तर त्यांनी कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून सहावा विजय मिळविला. जेव्हा ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले, त्यानंतर त्यांनी कोकणातील राजकारणात कधीही मागे वळून पाहिले नाही. एकेकाळी सिंधुदुर्ग हा समाजवाद्यांचा बालेकिल्ला होता. परंतु, नारायण राणे यांनी १९९० मध्ये सिंधुदुर्गच्या राजकारणात प्रवेश केला, आमदार झाले आणि सिंधुदुर्गसह रत्नागिरी जिल्ह्यातील गावागावांत शिवसेना संघटना उभी केली.
१९९५ च्या विधानसभा निवडणुकीत कोकणात शिवसेनेचे जे ११ आमदार निवडून आले, ते निवडून आणण्यामध्ये राणे यांचा वाटा मोठा होता. म्हणूनच जेव्हा शिवसेना-भाजप युतीचे सरकार पहिल्यांदा सत्तेवर आले, तेव्हा नारायण राणे राज्यात कॅबिनेट मंत्री बनले. इथून त्यांचा मुख्यमंत्रीपदापर्यंतचा प्रवास थक्क करणारा होता.
पशुसंवर्धन आणि दुग्धविकास खाते सुरुवातीला त्यांच्याकडे होते. कामाचा आवाका आणि व्यासंग यामुळे त्यावेळचे महसूलमंत्री सुधीरभाऊ जोशी कार अपघातात जखमी झाल्यानंतर, महसूलमंत्री पद राणे यांच्याकडेच देण्यात आले; जे पुढे कायम राहिले. १९९९ च्या जानेवारी महिन्यात तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा राजीनामा घेऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राणे यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली. त्यामुळे राणे महाराष्ट्रातील शिवसेनेचे प्रमुख नेते बनले. १९९९ मध्ये सत्ता गेली तरीदेखील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी राणे यांच्याकडे सोपवून शिवसेनेने त्यांचा सन्मान कायम ठेवला. २००४ पर्यंत विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी त्यावेळच्या आघाडी सरकारची अनेकदा कोंडी केली. २००४ च्या विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेला सत्ता मिळाली नाही, तरीही विरोधी पक्षनेतेपद ठाकरे यांनी राणे यांच्याकडेच सोपविले. एक आक्रमक नेता म्हणून महाराष्ट्रात त्यांची ओळख निर्माण झाली. त्यानंतर मात्र शिवसेनेशी त्यांचे बिनसले आणि २००५ मधे त्यांनी शिवसेना सोडली.
शिवसेना सोडल्यानंतर काही वर्षे त्यांचा राजकीय प्रवास अडखळत सुरू होता. परंतु, राजकीय इतिहासात सर्वप्रथम राणे यांनी शिवसेनेला त्यांच्या मुंबई या बालेकिल्ल्यातच हजारोंच्या गर्दीच्या अनेक सभा घेऊन कडवे आव्हान देण्याचे धाडस दाखवले. काँग्रेसने त्यांना पक्षात प्रवेश दिला आणि राज्यात महसूलमंत्रीपद दिले. राणे शिवसेनेविरोधात बोलत राहिल्यामुळे ते शिवसेनेचे कट्टर राजकीय विरोधक बनले. काँग्रेसमध्ये मंत्रीपदावर कार्यरत असतानाच २००८ मध्ये मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने त्यांनी काँग्रेस श्रेष्ठींविरोधात बंड केले; परंतु पुन्हा काँग्रेसने हा वाद मिटवून त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला.
तिथपासून २०१४ पर्यंत राणे काँग्रेस आघाडी सरकारमध्ये उद्योगमंत्री होते. परंतु, २०१४ च्या निवडणुकीत त्यांचा कुडाळ विधानसभा मतदारसंघात पराभव झाला. पुन्हा काँग्रेसने त्यांना मुंबईत वांद्रे (बांद्रा) मतदारसंघाच्या पोटनिवडणूक रिंगणात उतरवले, तिथेही ते पराभूत झाले. काँग्रेसने त्यांना त्यानंतर विधान परिषदेचे सदस्यत्व दिले. परंतु, २०१७ मध्ये राणे यांनी काँग्रेसलाही रामराम ठोकला आणि ''महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष'' हा नवा पक्ष स्थापन केला. या पक्षाने कणकवली नगरपंचायत एकहाती जिंकली, तसेच लोकसभा निवडणुकीतही चार लाख मते घेऊन शिवसेनेला मोठी टक्कर दिली होती. राणेंचे थोरले सुपुत्र निलेश राणे २००९ च्या लोकसभा निवडणुकीत खासदार बनले, मात्र त्यानंतरच्या दोन निवडणुकांमध्ये ते पराभूत झाले. त्यांचे दुसरे चिरंजीव नितेश राणे हे आमदार म्हणून दोनवेळा कणकवलीतून निवडून आले असून, ते सध्या भाजपचे आमदार, राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्रीआहेत. तर निलेश राणे हे कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार आहेत.
दरम्यान, २०१४ नंतर सात वर्षे राणेंचा राजकीय प्रवास संघर्षाचा राहिला. शिवसेनेने तर ''राणे संपले'' अशीच हाकाटी सुरू केली होती. परंतु, २०१९ मध्ये राणे यांना भाजपने राज्यसभेचे खासदार बनविले. नंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष विसर्जित करून त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना भाजपमध्ये प्रवेश दिला. एवढेच नव्हे, तर केंद्रीय मंत्रिमंडळात राणेंचा समावेश करून त्यांच्याकडे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची मोठी जबाबदारी दिली. या शपथविधीवेळी महत्त्वाची बाब म्हणजे, राणे यांना प्रथम क्रमांकाने शपथ घेण्याचा सन्मान दिला. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या दरबारात राणे यांना मोठा मान असल्याचे स्पष्ट झाले.
२०२४ मध्ये लोकसभा निवडणुका झाल्या. यात कोकणात राणे यांनी भाजपचा झेंडा फडकवला. कोकण आणि महाराष्ट्राच्या राजकारणात राणे यांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. कोकणचे भक्कम आधारस्तंभ तथा कोकणच्या विकासाच्या पायाभरणीत मोठे योगदान देणारे नारायण राणे १९९० ते आजतागायत अशी तब्बल ३६ वर्षे सक्रिय राजकारणात आहेत. १० एप्रिल रोजी ते वयाची ७४ वर्षे पूर्ण करून अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहेत. शिवसेना, काँग्रेस, महाराष्ट्र स्वाभिमान ते भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. यात महत्त्वाची बाब म्हणजे, राणे ज्या पक्षात गेले, त्या पक्षातील तळगाळातील कार्यकर्त्यांशी त्यांचे असलेले ऋणानुबंध कायम राहिले. त्यामुळे कोणत्याही पक्षातील कार्यकर्ता असला तरी तो राणेंना पितृतुल्यच मानतो. याचे कारण राणे कोणत्याही पक्षात असले, तरी त्यांनी आपल्या एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडले नाही. प्रत्येक सुख-दुःखाच्या प्रसंगात राणे हे कार्यकर्त्यांच्या खंबीरपणे पाठीशी राहिले.
कार्यकर्त्यांप्रमाणेच सिंधुदुर्गातील सर्वसामान्यांची नाळ राणेंशी जुळलेली आहे. मुंबई बेस्टचे चेअरमन असताना राणे यांनी स्वखर्चाने गावागावात साकव बांधून दुर्गम वाड्या एकमेकांशी जोडल्या. प्रत्येक गावात दर्जेदार रस्ता व्हायला हवा, यासाठी त्यांनी प्राधान्य दिले. सिंधुदुर्ग जिल्हा हा ‘पर्यटन हब’ व्हावा यासाठी त्यांनी नेटाने प्रयत्न केले. सी-वर्ल्ड, चिपी विमानतळ, एमआयडीसी यासाठी राणे विशेष आग्रही राहिले. जर त्यावेळी सी-वर्ल्डला राजकीय विरोध झाला नसता, तर आज सिंधुदुर्गचा चेहरामोहराच बदलून गेला असता; एवढी दूरदृष्टी राणेंची होती.
राजकारणात वेगवेगळी पदे भूषवत असताना सिंधुदुर्गातील पायाभूत आणि शैक्षणिक सुविधांनाही त्यांनी प्राधान्य दिले. सिंधुदुर्गात सर्वप्रथम अभियांत्रिकी महाविद्यालय त्यांनी सुरू केले. त्यामुळे जिल्ह्यातील गोरगरीबांची मुले आज अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करून मोठमोठ्या पदांवर काम करत आहेत. याखेरीज महिला भवन, पशुवैद्यकीय आणि दुग्धविकास महाविद्यालय, लाईफ टाईम हॉस्पिटल, गाईंच्या विविध प्रजातींचा समावेश असलेला गोवर्धन प्रकल्पही त्यांनी सुरू केला आहे. विविध सिंचन प्रकल्पही त्यांनी मार्गी लावले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गच्या विकासामध्ये राणेंचा महत्त्वपूर्ण वाटा राहिला आहे.

Baramati by-election News: बारामती पोटनिवडणूक : कॉंग्रेसची अखेर माघार, आकाश मोरे यांनी शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेतला

LPG Supply: होर्मुज मार्ग पुन्हा बंद! भारतात तेल टँकर येणार की नाही? केंद्र सरकारने प्लॅन B सांगितला, मोठी अपडेट समोर

Leopard enters house kitchen : बिबट्या थेट स्वयपाक घरात आला अन् पाहुणा झाला..., घायाळ बिबट्याला घरातून कसं काढलं बाहेर

Latest Marathi News Live Update : बारामतीच्या पोटनिवडणुकीमधून काँग्रेसची माघार

MHADA: तरुणांसाठी आनंदाची बातमी! म्हाडामध्ये काम करण्याची संधी, भरघोस पगार मिळणार; कसा कराल अर्ज?

SCROLL FOR NEXT